Wed, Jul 17, 2019 12:31होमपेज › Sangli › आगळगाव-निमजच्या युवकांमध्ये हाणामारी

आगळगाव-निमजच्या युवकांमध्ये हाणामारी

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:35AM

बुकमार्क करा
नागज : वार्ताहर 

आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे आगळगाव व निमज गावांतील युवकांमध्ये मंगळवारी रात्री जोरदार मारामारी झाली. दादागिरी करणार्‍या निमज येथील युवकांच्या दोन मोटारसायकली संतप्त ग्रामस्थांनी फोडल्या. या मारहाणीत दोन्ही गटांतील नऊ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांच्या 23 जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी आगळगाव येथे बुधवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.संतप्‍त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. आगळगाव येथे येऊन दहशत माजवणार्‍या युवकांचा तातडीने  बंदोबस्त  करून त्यांच्यावर  कारवाई  करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

मंगळवारी आगळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होती. ती पाहण्यासाठी निमज येथील युवकही आले होते. निमज व बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलींचा खो-खो सामना सुरू होता. त्यावेळी निमज येथील एका युवकाने पंच म्हणून काम करणार्‍या शिक्षकास शिवीगाळ केली.

आगळगाव येथील एकाने याबाबत निमजच्या संबंधित युवकाला जाब विचारला. त्याने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. निमज व आगळगावमधील युवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. निमज येथील युवकाला मारहाण झाली होती. 

दरम्यान गावातील काही प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण मिटवले होते. पण तरीही मारहाण केल्याचा राग मनात धरून निमज येथील सुमारे पन्नास युवक काठ्या आणि लोखंडी गज घेऊन रात्री साडेसात वाजता आगळगावात आले. ‘कुणाच्यात दम असेल तर  बाहेर या’, असे म्हणत ते गावातून फिरू लागले.  त्यांनी गावात रस्त्यावरून फिरणार्‍या दिसेल त्याला मारहाण करायला  सुरूवात केली अशी तक्रार आहे. 

या मारहाणीत आगळगाव येथील मनोज पाटील, सारंग पाटील, आकाश पाटील, रणजीत निकम, नागेश पाटील हे जखमी झाले. निमज येथील युवकांची दादागिरी बघून आगळगाव येथील संतप्त युवक रस्त्यावर उतरले. त्यांनी निमजच्या युवकांना काठी व गजाने मारहाण करायला सुरूवात केली. 

या युवकांचा आक्रमक पवित्रा पाहून निमजच्या काहीजणांनी पलायन केले. अक्षय कोळेकर, दादासाहेब रूपनर, राहुल साबळे, (सर्व रा.निमज) व कृष्णा व्हनमाने (रा.जुनोनी) हे चारजण जमावाच्या हाती लागले. त्यांना आगळगावच्या ग्रामस्थांनी जबर मारहाण केली. संतप्त ग्रामस्थांनी निमजच्या दोन मोटारसायकल फोडल्या.

या घटनेचे वृत्त कळताच कवठेमहांकाळचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मारहाणीत जखमी झालेल्या चार युवकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी आगळगावात येऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

या प्रकरणी आगळगाव येथील संदीप गजानन पाटील यांनी अक्षय कोळेकर, दादासाहेब रूपनर, बबलू रूपनर, सोपान रूपनर, दत्तात्रय रूपनर, नितीन आमुणे, राहुल बाबासाहेब साबळे, जोतिर्लिंग टोणे, सचिन मदने, अतुल मदने (सर्व रा.निमज) व कृष्णा नानासो व्हनमाने (रा.जुनोनी) यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात  फिर्याद  दाखल केली. 

अक्षय कोळेकर याने संदीप पाटील, मनोज पाटील, सारंग पाटील, आकाश पाटील, रणजित निकम, नागेश पाटील (सर्व रा.आगळगाव) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

आगळगावात कडकडीत बंद

या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी  आगळगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. हायस्कूल व मराठी शाळेलाही सुटी देण्यात आली. गावातून निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, सरपंच व्यंकटराव पाटील, उपसरपंच शंकरराव मोहिते, भारत निकम, गोविंदराव पाटील, शंकरराव पाटील, संदीप पाटील, पोलिस पाटील रणजीत पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आगळगाव, नागजसह परिसरात दहशत माजवणार्‍या निमज येथील गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आगळगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आले आहे.