Sat, Apr 20, 2019 10:38होमपेज › Sangli › माणगंगा कारखान्याची बिले आठ दिवसांत मिळणार

माणगंगा कारखान्याची बिले आठ दिवसांत मिळणार

Published On: Feb 10 2018 5:53PM | Last Updated: Feb 10 2018 5:53PMआटपाडी : प्रतिनिधी
माणगंगा साखर कारखान्याने गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. सदरची बिले तात्काळ द्यावीत या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक शेतकऱ्यांची बिले आठ दिवसांत देण्याचे लेखी आश्वासन माणगंगा कारखान्याच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले.

उसाचे बिल द्या, घामाचा दाम मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आज आटपाडी बसस्थानकापासुन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे म्हणाले 'गेल्या हंगामातील कोणतेही बिल थकित नाही असे कारखान्याने साखर आयुक्त कार्यालयाला कळविले आहे.परंतु वस्तुस्थिती तशी नाही.गेल्यावर्षीची बिले अद्याप थकित आहेत.दुष्क़ाळातला कारखाना चालावा आणि शेतकरी ही जगला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चेअरमन आणि कार्यकारी संचालक फोन उचलत नाहीत.त्यामुळे तात्काळ बिले द्यावीत.'
किसान सभेचे अरुण माने म्हणाले, 'कारखान्याने थकित बिलाचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा.शेतकरी बिकट अवस्थेत आहे.वर्षभर बिल थकली असताना शेतकरी वर्गाने किती संयम बाळगावा याला मर्यादा आहेत.कारखाना अडचणीत आहे परंतु गतवर्षीची बिले दिलीच पाहिजेत.'

सभेनंतर तह्सील कार्यालयात नायब तहसीलदार बी.एम.सवदे यांच्या उपस्थितीत माणगंगा साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलनास उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची बिले आठ दिवसांत आणि उर्वरीत बिले ५ मार्चपर्यंत देण्याचे लेखी आश्‍वासन यावेळी देण्यात आले. या वेळी आंदोलकांनी प्रभारी कार्यकारी संचालक नामदेव मोटे हे फोन उचलत नाहीत. उध्दटपणे बोलतात अशा तक्रारी केल्या. व्हाईस चेअरमन भगवानराव मोरे,नामदेव मोटे,सभापती हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते.  आंदोलनात संघटनेचे ल्हाध्यक्ष विकास देशमुख,सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे,सयाजी मोरे,सचिन पाटील,सुरज पाटील,संजय बेले,मानसिंग कदम,सांगली,सातारा,सोलापुर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.मोर्चानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.