Mon, Jun 24, 2019 21:32होमपेज › Sangli › ताळमेळ न लागलेल्या ४१ हजार शेतकर्‍यांचा डाटा आला

ताळमेळ न लागलेल्या ४१ हजार शेतकर्‍यांचा डाटा आला

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:35PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यस्तरावर पात्र-अपात्रता निश्‍चित न झालेल्या 40 हजार 515 हजार शेतकर्‍यांचा ‘डाटा’ शहानिशा करण्यासाठी जिल्हा बँकेकडे आला आहे. जिल्हा बँकेच्या शाखास्तरावर बँकेचे अधिकारी व लेखापरीक्षक यांच्या माध्यमातून माहितीची शहानिशा व त्रुटी दुरुस्ती होईल. तालुकास्तरीय समिती पात्र-अपात्रतेबाबत निर्णय घेईल व पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी लाभ मिळेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी दिली. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’साठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यात 87 हजार 523 शेतकर्‍यांना 182 कोटींचा लाभ मिळाला आहे. 26 हजार 494 शेतकर्‍यांना ओटीएस अंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत दीडलाखावरील थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय 22 हजार शेतकर्‍यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा दुरुस्त करून शासनाला सादर केली जात आहे. 

दरम्यान सोमवारी शासनाकडून आणखी 40 हजार 515 शेतकर्‍यांची माहिती जिल्हा बँकेला आली आहे.  अर्जदार शेतकर्‍यांनी अर्जात दिलेली माहिती व बँकेने शासनाला सादर केलेली माहिती याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे राज्यस्तरावर पात्र-अपात्रता निश्‍चित करता आली नाही. त्यामुळे या 40 हजार 515 शेतकर्‍यांची माहिती शासनाने जिल्हा बँकेकडे पाठविली आहे. 

शासनाकडून आलेल्या या शेतकर्‍यांची यादी व कर्जासंदर्भातील माहिती बँकेच्या संबंधित शाखांकडे पाठविली जाणार आहे. शाखेत ही माहिती सुचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. लेखापरीक्षक व बँकेच्या शाखाअधिकर्‍यांमार्फत (तपासणी गट) माहितीची तपासणी केली जाईल. संबंधित शेतकर्‍यांकडूनही माहिती घेतली जाईल. त्रुटींची दुरुस्ती केली जाईल. तपासणी गटाने ही कार्यवाही पंधरा दिवसात करायची आहे. तपासणी गटाच्या शिफारशीवर तालुकास्तरीय समितीकडून पात्र-अपात्रतेचा अंतिम निर्णय होईल. उप/सहायक निबंधक यांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीने पात्र ठरवलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसचा लाभ दिला जाणार आहे.