Thu, Sep 20, 2018 06:05



होमपेज › Sangli › अनुदानासाठी शेतकर्‍याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न 

अनुदानासाठी शेतकर्‍याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न 

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:45PM



सांगली : प्रतिनिधी

बेळुंखी (ता. जत) येथील गोरख बजाबा केंगार या शेतकर्‍याने सोमवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ते काडी ओढून पेटवून घेणार इतक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गोठा आणि पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर घरकुलाचे अनुदान  मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 

दरम्यान, पोलिसांनी केंगार यांना ताब्यात घेऊन येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. केंगार यांना रोजगार हमी योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वी गोठा मंजूर झाला. सहा हजार रुपये  मिळाले. उर्वरित अनुदान  मिळण्यासाठी कागदपत्रे सादर केली. मात्र, पैसे देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूलही मंजूर झाले आहे. मात्र अद्याप त्यांना ते मिळालेले नाही. या दोन्ही अनुदानासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैसे न मिळाल्यास  आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला होता. 

आज दुपारी एकच्या सुमारास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. कोणाचे लक्ष नाही, असे पाहून त्यांनी बरोबर आणलेला रॉकेलचा कॅन अंगावर ओतून घेतला. काडी  ओढून पेटवून घेत असतानाच त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या हातातून आगपेटी काढून घेतली.  त्यावेळी केंगार आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. 

त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.