सांगलीः प्रतिनिधी
बेळुंखी(ता. जत) येथील गोरख बजाबा केंगार या शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अंगावर रॉकेल ओतून घेतले. ते काडी ओढून पेटवून घेणार एवढ्यात पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जनवरांचा गोठा आणि पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरकूल मंजूर झाले आहे, मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान पोलिसांनी केंगार यांना ताब्यात घेऊन येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.
केंगार यांना रोजगार हमी योजने अंतर्गत जनावराचा गोठा तीन वर्षापूर्वी मंजूर झाला. त्यानुसार सहा हजार रुपये मिळाले. मिळालेली रक्कम आणि हातउसने आणि व्याजाने रक्कम घेऊन गोठ्याचे काम पूर्ण केले. बाकीचे अनुदान मिळण्यासाठी कागदपत्रे सादर केली. मात्र पैसे देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्याशिवाय त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. मात्र अद्याप त्यांना ते मिळालेले नाही. या दोन्ही कामाच्या रक्कमेसाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. हे पैसे न मिळाल्यास रॅाकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
आज दुपारी एकच्या सुमारास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. कोणाचे लक्ष नाही, असे पाहून त्यांनी बरोबर आणलेला रॉकेलचा कॅन अंगावर ओतून घेतला. बरोबर आणलेल्या काड्यापेटीतून ते काडी ओढून पेटवून घेत असतानाच त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी केंगार यांना पकडले. त्यांच्या हातातून काड्याची पेटी काढून घेतली. त्यावेळी केंगार आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरिक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.
...अन् पोलिसांची उडाली तारांबळ
धर्मा पाटील या शेतकर्याने शेतजमिनीची योग्य ती भरपाई न मिळाल्याने मंत्र्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर केंगार यांनी हे पाऊल उचलल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना तातडीने ताब्यात घेऊन सिव्हिलमध्ये दाखल केले.