होमपेज › Sangli › राज्यात हे सरकारच खरे लाभार्थी : उद्धव ठाकरे

राज्यात हे सरकारच खरे लाभार्थी : उद्धव ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे 

सरकारच्या सध्या " मी लाभार्थी " या शीर्षकाखाली सगळ्या टिव्हीवर वर्तमान पत्रांतून इतर ही मीडियात जाहिराती सुरु आहेत. पण राज्यात तुम्ही नाही तर सरकारच लाभार्थी आहे, सत्ता भोगायला तुम्ही जनतेने दिली आहे. तुम्हाला काही नाही पण सरकारला सगळं मिळतंय. म्हणून मुख्यमंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांचे फोटो लावा अन्‌ जाहिरात करा, होय मी खरा लाभार्थी.... अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. 

सांगली जिल्ह्यातील  कार्वे (ता. खानापूर) येथील शेतकरी संवाद या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, आमदार अनिलराव बाबर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पाटील, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, राज्यात सत्ता बदलूनही काहीही फरक पडलेला नाही. लोकांनी पहिले काँग्रेसचे सरकार घालवले आणि तुम्हाला निवडून दिले कशासाठी?  आम्हीही तुम्हाला काहीतरी चांगले कराल म्हणून पाठिंबा दिला ना ? शेतकरी संकटात आहे, नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक अडचणीत सापडले आहेत. मग सत्ता बदलून उपयोग काय झाला? उगाच कसल्या जाहिराती करता ? मी लाभार्थी ! परवा कोणीतरी सांगितले की म्हणे जे चेहरे वापरलेत त्या जाहिरातीत त्यांना प्रत्यक्षात काही मिळालेच नाही. मग हा कशासाठी हा खोटारडेपणा चालू आहे. 

या सरकारला तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिले. ते द्राक्षाच्या बागेत जा, एका बाजूला पाणी आहे पण वीज मिळत नाही तरीही बिले मात्र येत आहेत. दोन महिन्या पूर्वी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्यासाठी सौभाग्य योजना आणली मात्र त्‍याचे काय झाले असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला.


छत्रपती शेतकरी सन्मान योजना आणली जून महिन्यात सांगितले होते कर्ज माफी देऊ मात्र वर्ष होऊनही कर्जमाफी देण्यात आली नाही. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात साडे दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले आहेत असे सांगतात मात्र ते मिळाले का ? तुम्ही सांगता  ३४ हजार कोटींची कर्ज माफी केली, ४० हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचे , ८९ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असे सांगत आहात तर मग गेले कुठे सगळे ? असा सवाल करून सरकारवर जोरदार टीकास्‍त्र सोडले. 

यावेळी कर्ज माफीच्या नावाखालीही ऑनलाईन घोटाळा सुरु आहे की काय अशी भीती वाटायला लागली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर इथे जसा भगवा दिसतोय तसा सगळा जिल्हा भगवा करून दाखवा. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री तिथे बसवायचा आहे अशी भावनाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

टेंभू योजनेबाबतही त्यांनी टीका केली. विदर्भ मराठवाड्याच्या लोकांसाठी इथे का अन्याय चालवला आहे ? अशी विचारणा केली. यावेळी आमदार बाबर यांनी ज्या ज्या वेळेला राज्यात संकट येते त्या वेळेला आपण आणि आपला पक्ष धावून येतो असे म्हटले जाते पण आमचा भाग कायमच संकटात आहे, दुष्काळात आहे. इथल्या भागातले लोक दणकट असल्याचे सांगितले.

सुहास बाबर यांनी आपल्या प्रास्ताविकात टेंभू च्या कामांच्यासाठी पुरेसा निधी द्यावा अशी मागणी केली. 

यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून नितीन जाधव, संभाजी जाधव, व्यापारी असोशिएशनचे विपुल शहा, फटाके व्यावसायिक राजू मुल्ला आदींची भाषणे झाली. संजय विभुते यांनी आभार मानले.