Wed, Nov 14, 2018 00:03



होमपेज › Sangli › 22 हजार शेतकर्‍यांच्या त्रुटींचा ‘डाटा’ आला

22 हजार शेतकर्‍यांच्या त्रुटींचा ‘डाटा’ आला

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:36PM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसचा लाभ न मिळालेल्या 21 हजार 900 शेतकर्‍यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे. माहितीची शहानिशा करून दुरुस्त माहिती शासनाला सादर होणार आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’साठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यात शासनाने 87 हजार 523 शेतकर्‍यांना 182 कोटींचा लाभ दिला आहे. यामध्ये 25428 शेतकर्‍यांची 90.49 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 62095 शेतकर्‍यांना 91.53 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. 26494 शेतकर्‍यांना ओटीएस अंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी दि. 31 मार्च 

2018 पर्यंत दीडलाखावरील थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेसाठी नोंदणी झालेल्या अर्जातील व बँकांकडून सादर झालेल्या माहितीत त्रुटी, चुका आढळल्या आहेत. जिल्ह्यातील 21 हजार 900 शेतकर्‍यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा शासनाकडून आला आहे. 

चुका, त्रुटी.. एक दृष्टीक्षेप; माहिती चुकीची की कर्जमाफीस अपात्र!
कर्जमाफीसाठीच्या अर्जात थकबाकीदार आहे का या रकान्यात आहे असे नमूद आहे, पण थकबाकीच्या रकमेच्या रकान्यात शून्य असे नमूद असणे अथवा थकबाकादीर नाही असे नमूद असताना थकबाकीची रक्कम नमूद असणे, कर्जमाफी योजनेचा लाभ सन 2009 ते 2016 पर्यंतच्या थकीत कर्जाला असताना या तारखेपूर्वीच्या काही तारखांच्या कर्जाचा उल्लेख असणे, थकबाकीची तारीख चुकीची असणे आदी चुका आहेत. माहिती व तारीख चुकीची आहे की कर्जमाफीस अपात्र आहे याबाबतची शहानिशा केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून या 21 हजार 900 शेतकर्‍यांची माहिती शासनाला ऑनलाईन पाठविली जाणार आहे.