Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Sangli › बेदाण्याची परस्पर विक्री; दहा लाखांची फसवणूक

बेदाण्याची परस्पर विक्री; दहा लाखांची फसवणूक

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:43PM कुपवाड : वार्ताहर 

येथील एमआयडीसीतील गौरी कोल्ड स्टोअरेजचे मालक रमण गोवर्धन अरोरा व त्याची पत्नी संगीता या दोघांवर बेदाण्याची परस्पर विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. या दोघांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍याचा दहा लाखांचा बेदाणा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांत शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सतीश नरसिंग जगताप (रा. सोहाळे, ता. मोहोळ) यांनी त्यांचा दहा लाख रुपये किमतीचा बेदाणा (16 हजार 170 किलो) कुपवाड एमआयडीसीतील गौरी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला होता. कोल्ड स्टोअरेजचे मालक रमण अरोरा व त्याची पत्नी संगीता या दोघांनी संगनमत करून शेतकर्‍याची परवानगी न घेता एप्रिल ते जून 2017 या कालावधीत बेदाण्याची परस्पर विक्री केली आहे. 
शेतकरी जगताप यांनी कोल्ड स्टोअरेजमधील बेदाण्याबाबत अरोरा यांच्याकडे वेळोवेळी चौकशी केली. अरोरा याने शेतकर्‍याला वेळोवेळी बेदाणा मालाच्या दराबाबत बनावट पावत्या त्यांच्या मोबाईलवर पाठविलेल्या आहेत.

त्यामुळे या शेतकर्‍याने मालक अरोरा यांच्यावर विश्‍वास ठेवला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून जगताप यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये स्वत: जावून पाहणी केली.

त्यावेळी त्यांना आपला बेदाणा कोल्ड स्टोअरेज्च्या मालकाने परस्पर विक्री करून आपली फसवणूक केल्याचे समजले. याबाबत त्यांनी अरोरा याच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेतकर्‍याने या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. पोलिस उप निरीक्षक बाबासाहेब माने तपास करीत आहेत. 
गौरी कोल्ड स्टोअरेच्या मालकाने आणखी काही शेतकर्‍यांची फसवणूक केली असेल, तर अशा शेतकर्‍यांनी तातडीने कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.