Tue, Jun 18, 2019 22:29होमपेज › Sangli › बनावट नोटांप्रकरणी एटीएसचे पथक सांगलीत : सुहेल शर्मा

बनावट नोटांप्रकरणी एटीएसचे पथक सांगलीत : सुहेल शर्मा

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 2:14AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत बनावट नोटा खपवणार्‍या टोळीतील पाचजणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसची मदत घेण्यात आली आहे. एटीएसचे एक पथक सांगलीत दाखल झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.  

अधीक्षक शर्मा म्हणाले, सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटा खपवणार्‍या एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यातील सूत्रधारासह पाचजणांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रेमविष्णू राफा, राज सिंग, नरेंद्र ठाकूर, मनीष ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे.  पाचही संशयितांकडे केलेल्या चौकशीत याची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय या प्रकरणाची व्याप्ती पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. आंतरराज्य टोळी यात कार्यरत असल्याने याच्या तपासासाठी एटीएसची मदत घेण्यात येत आहे. यासाठी एक पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले आहे. 

यातील प्रमुख तीन  संशयित राफा, ठाकुरी आणि जिलानी शेख सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे पथकाकडून त्यांची कसून चौकशी सुरू  आहे. शिवाय यामध्ये देश विघातक शक्ती कार्यरत असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचीही मदत घेण्यात येत आहे. पथकाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एटीएस आणि पोलिसांचे एक संयुक्त पथक पश्‍चिम बंगालला तपासासाठी पाठवण्यात येणार असल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.