Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Sangli › जिगरबाज बागणीकरांना ‘लेक लाडकी’

जिगरबाज बागणीकरांना ‘लेक लाडकी’

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:24PMबागणी : प्रतिनिधी

एकीकडे दर हजारी मुलींची  संख्या कमी होत असताना वाळवा तालुक्यातील बागणी येथे मात्र दर हजारी मुलांमागे तब्बल 1200 मुलींची संख्या नोंद झाली आहे. चालू वर्षात लिंगगुणोत्तरात हा जिल्ह्यात उच्चांक ठरला आहे. 

सांगली जिल्ह्यात दर हजारी मुलांंमागे मुलींची संख्या जेमतेम 913 इतकी आहे. अनेक तालुक्यात तर ती फारच कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर बागणी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये मुलींची वाढती संख्या समाजासाठी चांगला संदेश देणारी ठरते आहे.  

हत्तीवरुन साखर वाटप....

बागणी या गावाला पुरोगामी विचारसरणीची परंपरा आहे. जणू याच परंपरेची वीण घट्ट करण्यासाठी म्हणून की काय सात आठ महिन्यापूर्वी एका कुटूंबाने हत्तीवरुन गावात साखर वाटप करुन कन्याजन्माचे स्वागत केले होते.

समाजात मुलींचा जन्म नाकारण्याची मानसिकता  वाढत आहे, मुलगी नको म्हणून अनेक ठिकाणी स्त्री भ्रूणाची हत्या करण्याची मानसिकता आहे. मात्र अशा काळात वारणाकाठच्या पुरोगामी बागणीने मात्र पुरोगामित्वाची पताका फडकावित ठेवली आहे.  चालू वर्षात एप्रिल ते जुलै अखेर येथे लिंगगुणोत्तराचे प्रमाण वाढले आहे.  हजारी 1200 इतके प्रमाण झाले आहे. मुला-मुलींच्या दर हजारी प्रमाणात एकीकडे घट येत असताना बागणीमध्ये मात्र यात  झालेली वाढ ही जिल्ह्यातच नव्हे तर   राज्यभरात उच्चांक मानला जातो आहे.

बागणी येथे एप्रिल 2018 पासून आजअखेर मुलींचे हजारी प्रमाण 1200 इतके झाले आहे.  सन 2017-18 मध्ये मात्र हेच प्रमाण जेमतेम 738 इतकेच होते. गेल्या चार वर्षातील मुलींची संख्या, लिंगगुणोत्तराचे प्रमाण याबाबतची आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिली आहे.

दरम्यान,  आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण नांद्रे यांच्यासह कर्मचारी, आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस यांनी गर्भवतींची नोंद करण्यापासून त्यांना शासनाच्या  योजनांबाबत माहिती देण्यापर्यंत पाठपुरावा केला. दरम्यान,  ग्रामसभेत आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.