होमपेज › Sangli › शाळकरी मुलीच्या मदतीसाठी धावले अनेकजण

शाळकरी मुलीच्या मदतीसाठी धावले अनेकजण

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:25PMलिंगनूर : वार्ताहर

सलगरे येथे सोमवारी आठवडा  बाजार होता. वाहनांची गर्दी. आठवडा बाजार ओलांडून जाणार्‍या रस्त्यावर सायकलवर मागे बसलेल्या शाळकरी मुलीचा पाय मागच्या चाकात अडकला अन  एकच धावपळ उडाली.

मळाभागात जाणार्‍या सर्वच मुलांच्या सायकली थांबल्या. दुचाकीसह अनेक गाड्या थांबल्या. एकाने ऊसवाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला थांबविले. दंडकारण्य पतसंस्थेचे खटाव शाखेचे व्यवस्थापक, एका दवाखान्यातील कर्मचारी यांनी मदतीला सुरुवात केली. पाय निघेना हे लक्षात येताच विकास सोसायटीचे अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या  सल्ल्यानुसार पकडीने चाकाच्या चार पाच तारा तोडण्यात आल्या अन पाय सहीसलामत बाहेर निघाला.  सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

 जितेंद्र होनराव यांनी त्या मुलीला गाडीवरून घरी पोहोच केले. त्यामुळे सलगरे परिसराची अशीही संवेदनशीलता चर्चेची ठरली. 

रस्त्याची दुरुस्ती आवश्यक

विद्यार्थ्यांना सायकलवरून जाताना अन्य वाहनांची काळजी घेत प्रवास करावा लागतो. सलगरे येथे पूर्वेकडील ओढ्यापर्यंत रस्ता खड्डे आणि धुळीने भरला आहे. तर काही ठिकाणी ऊसवाहतूक आणि  वेगवान गाड्यांमुळे  मुलांचा सायकल प्रवासही धोक्यात येऊ शकतो. तेंव्हा रस्त्याची दुरुस्ती सरकारने करावी आणि अन्य शिस्त सर्वांनीच पाळावी, अशी अपेक्षा  आहे.