Mon, May 20, 2019 08:05होमपेज › Sangli › दीर्घ रजेवरील जत बीडीओंची पुरंदरला बदली

दीर्घ रजेवरील जत बीडीओंची पुरंदरला बदली

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 11:23PMसांगली : प्रतिनिधी

दीर्घ रजेवरील जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलींद टोणपे यांची अखेर पुरंदर पंचायत समितीकडे बदली झाली आहे. बदलीनंतर रजेवर गेलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांची चंदगडचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मिरज व पलूसच्या गटविकास अधिकार्‍यांचा एकमेकांना ‘खो’ बसला आहे. खानापूर व वाळवा पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांचे रिक्त पदे भरले आहे. राज्यात ग्रामविकास विभागाकडील वर्ग अ च्या 70 अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांचा शासन आदेश मंगळवारी जारी झाला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराने जत पंचायत समितीचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. गहाणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर टोणपे यांची जतचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली होती.मात्र एकूण ‘रागरंग’ पाहून त्यांनी लगेचच बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. रुजू झाल्यानंतर अडीच-तीन महिन्यांनी रजेवर गेले. पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर ते रजेवरून परत आले. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये ते परत रजेवर गेले ते आजपर्यंत रजेवरच होते. अखेर त्यांची पुरंदर पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. श्रीमती अर्चना वाघमळे यांची जतच्या गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सध्या त्या नियुक्तीशिवाय होत्या. 

मिरज-पलूस ‘खो-खो’

पलूसचे गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांची बदली मिरज गटविकास अधिकारीपदी तर मिरजेचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे यांची पलूसचे गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. चंद्रपूर, जालन्याहून वाळवा, खानापूरचंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. ए. शिंदे यांची वाळवा पंचायत समितीकडे तर  जालना जिल्ह्यातील घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. टी. पवार यांची खानापूर पंचायत समितीकडे बदली झाली आहे.

रविकांत अडसूळ - रमेश जोशी कोल्हापूर जिल्ह्यात

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रमेश जोशी यांची दि. 31 जानेवारी 2018 रोजी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरकडे बदली झाली होती. मात्र ते हजर झाले नव्हते. अखेर त्यांची बदली चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारीपदी झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ व रमेश जोशी यांच्यात ‘शीतयुद्ध’  रंगले होते. अडसूळ हे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर जोशी यांचीही कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे.