Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Sangli › किलबिलाटाने गजबजले शाळांचे प्रांगण

किलबिलाटाने गजबजले शाळांचे प्रांगण

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:34PMसांगली : प्रतिनिधी

नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, उत्साह नवा. शाळाही रंगलेल्या, रांगोळ्यांनी  फुललेल्या. विद्यार्थ्यांमध्येही अनोखा उत्साह. गुलाबाचे पुष्प देऊन आणि पेढा भरवून शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचे अनोखे स्वागत केले जात होते. शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.

प्राथमिक, माध्यमिक शाळांचा शुक्रवारी ‘शाळेचा पहिला दिवस’ होता.  जिल्ह्यात सर्वत्र गावांमध्ये सकाळी प्रवेश फेरी निघाली. ढोल, ताशे वाजवून शाळेच्या पहिल्या दिवसांचे स्वागत झाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, व पालकांच्या उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला.जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे आरग येथील मुलींच्या शाळेत स्वागतासाठी सकाळीच उपस्थित झाल्या होत्या. या शाळेचा पट 450 इतका नोंदला आहे. खासगी शाळांमधील 23 मुलींनी जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश घेतला आहे. 

पहिलीचे विद्यार्थी रथातून आले शाळेत !

बोरगाव (ता. तासगाव) येथे पहिलीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी रथातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आले होते. सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधले होते. शाळेत त्यांचे गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पाटील तसेच पालक, शिक्षक उपस्थित होते.