Sun, May 26, 2019 12:38होमपेज › Sangli › धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:24PMसांगली : प्रतिनिधी

येथील विजयनगरमधील जिल्हा न्यायालय इमारतींच्या आवारातील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण सोमवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी काही नागरिक जमा झाले होते. परंतु, संबंधितांना नोटिसा देऊन ही कार्यवाही करण्यात आली. 

उच्च न्यायालयाने रस्त्यावर, तसेच सार्वजननिक ठिकाणी धार्मिक स्थळांची बेकायदा असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी गेल्यावर्षी शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाची यादी तयार केली होती. यामध्ये विजयनगर येथे नव्याने झालेल्या न्यायालयाच्या दारातच तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण होते. त्यामुळे न्यायालयाच्या कंपौंड वॉललाही अडचण होती. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात न्यायालयाने महापालिका, तसेच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. वकिलांच्या वतीनेही तशी मागणी करण्यात आली होती. परंतु, धार्मिक प्रश्‍न असल्याने प्रशासनाकडून तत्काळ कारवाई झाली नव्हती. याबाबत पुन्हा विचारणा झाल्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाने याबाबत एकत्र बैठक घेतली. त्यानुसार आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी  उपायुक्‍त स्मृती पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख डी. टी. घोरपडे, तसेच सहाय्यक संचालक नगररचना यांना प्राधिकृत केले. 

वास्तविक या  धार्मिक स्थळांचा कोणताही अधिकृत ट्रस्ट नाही.तरीदेखील तेथे पूजा सुरू होती. संबंधितांना याप्रकरणी  नोटीस ही देण्यात आली.  संबंधितांना विश्वासात घेवून सोमवारी पहाटे ही धार्मिक स्थळे पथकाने हटविली. संबंधित नागरिकांच्या ताब्यात तेथील मूर्तीसह अन्य साहित्य देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस, महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन ही कार्यवाही केली.

जमादारवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

विजयनगरमधील न्यायालयाच्या परिसरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या इम्रान महमद जमादार (वय 31, रा. गणेशनगर, सांगली) याने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घटनास्थळी जाऊन छर्‍याच्या बंदुकीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो पळून जाऊ लागला. त्यानंतर त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याला ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सायंकाळी त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.