Tue, Jun 18, 2019 22:20होमपेज › Sangli › ‘शिक्षण’च्या 1.80 कोटींच्या खरेदीस मंजुरी

‘शिक्षण’च्या 1.80 कोटींच्या खरेदीस मंजुरी

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:06AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना  संगणक व अन्य साहित्य खरेदीच्या 1.80 कोटी रुपयांच्या खरेदीस स्थायी समिती सभेने अखेर मंजुरी दिली. खरेदी प्रक्रिया पारदर्शीपणे राबविणे तसेच शाळांच्या गरजेनुसार साहित्य खरेदीचे निर्देश देण्यात आले.

जिल्हा परिषदेत बुधवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सभापती अरुण राजमाने, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, तम्मनगौडा रवी, ब्रह्मदेव पडळकर, सदस्य सत्यजित देशमुख, डी. के. पाटील, अर्जुन माने-पाटील, संभाजी कचरे, नितीन नवले, सुनीता पवार, अश्‍विनी पाटील, सुरेखा आडमुठे तसेच खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

शाळांना संगणक खरेदीसाठी 70 लाख, एलसीडी प्रोजेक्टर खरेदीसाठी 39 लाख, चार टक्के सादिलमधून खरेदीसाठी 40 लाखांच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मते मांडली होती. त्यावरून स्थायी समिती सभेत या विषयांना मान्यता देताना निर्देश दिले आहेत. संगणक खरेदी प्रक्रिया पारदर्शी व्हावी. ब्रँडेड कंपनी, तांत्रिक बाबी, गॅरंटी, वॉरंटी पाहणे,  पुरवठादाराकडून अनामत घेणे या बाबींची खातरजमा करूनच खरेदी करण्यास मान्यता दिली. शाळांच्या गरजेनुसार सदस्य व मुख्याध्यापक यांच्या शिफारशीने चार टक्के सादिलमधून खरेदी व्हावी. एलसीडी प्रोजेक्टरपेक्षाही अद्ययावत उपकरण असेल तर खरेदीस प्राधान्य द्यावे, असे सदस्यांनी सुचविले. शाळा इमारती दुरस्तीसाठी 3 कोटी आणि इमारत बांधकामासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद डीपीसीतून झाल्याची माहिती सभापती तम्मनगौडा रवी यांनी दिली. 

मराठा आरक्षणातील अंतिम निवड यादीतील उमेदवारांना नेमणूक  आदेश देण्यास होत असलेल्या विलंबावरून सत्यजीत देशमुख यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही खडेबोल सुनावले. तातडीने नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 157 कि. मी. लांबीच्या रस्ते कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्लास्टिकचा वापर करून रस्ते कामासाठी प्राधान्य राहणाार आहे.