Sun, Aug 18, 2019 15:10होमपेज › Sangli › ड्रायपोर्टच्या नावे जागा हडपण्याचा घाट

ड्रायपोर्टच्या नावे जागा हडपण्याचा घाट

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:24PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

रांजणी (ता. कवठेमहांकाळ येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा ड्रायपोर्टच्या नावे हडप करण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा  आरोप  माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी येथे पत्रकार बैठकीत केला. यामागे खासदार संजय पाटील यांच्यासह काही भाजप नेते  असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, त्यांनी अन्य कोठेही ड्रायपोर्ट उभारावा, पण महामंडळाची इंचही जागा देणार नाही. प्रसंगी धनगर समाज रस्त्यावर उतरून विरोध करेल.

शेंडगे म्हणाले, आमचा ड्रायपोर्टला विरोध नाही. पण धनगर समाजाला उद्ध्वस्त करणारा विकास नको. प्रस्तावित गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालतच्या रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे शेळी-मेंढी विकास महामंडळाची 2200 एकर जागा आहे. ही जागा 1974 पासून माजी मंत्री (कै.) शिवाजीराव शेंडगे यांच्या पुढाकाराने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  शेळी-मेंढी पैदाशीचे नवे तंत्र  नव्या पिढीला आत्मसात करता यावे, यासाठी ही जागा राखीव आहे.  गेल्या पंचवीस वर्षांत या प्रकल्प जागेला कोणत्याही सरकारने पैही दिली नाही. त्यामुळे तिथे विकास होऊ शकला नाही. तिथे कृषी विद्यापीठ झाले असते तर नक्कीच फायदा झाला असता. पण ते न करता आता ड्रायपोर्टचा घाट केवळ जागा हडप करण्यासाठी घातला आहे. वास्तविक ही जागा महामंडळाच्या नावे असताना त्याचा प्रस्ताव आणि टेंडर प्रक्रिया होतेच कशी? खासदार पाटील यांच्या गतीमान कारभाराचा हा नमुना आहे. ते म्हणाले, दिल्लीत तुकलघाबाद येथे जे देशातील सर्वात मोठे ड्रायपोर्ट आहे. ते केवळ शंभर एकरांवर आहे. मग येथे 500 एकर त्यांना जागा हवीच कशासाठी? अन्य गायरान 500 एकर जमीन आहे त्यात त्यांनी ड्रायपोर्ट उभारावे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटणार आहे. जबरदस्तीने जागा हस्तांतरणाचा प्रयत्न केला तर धनगर समाज रस्त्यावर उतरेल.

जतचे आमदार अयशस्वी

शेंडगे यांनी जतचे  आमदार विलासराव जगताप अयशस्वी ठरले असल्याची टीका त्यांचे नाव न घेता केली. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाला गती आली. मात्र यांची केंद्र व राज्यात सत्ता असूनही योजनेचे एक इंच सुद्धा काम झाले नाही. त्यांना काम करण्यास संधी मिळावी, म्हणून मी तीन वर्षे काही बोललो नाही. मात्र यापुढे जत तालुक्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे.