Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Sangli › पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; 5 जखमी

पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; 5 जखमी

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 11:30PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत महापालिकेसमोर गुरुवारी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला. रस्त्यावरून जाणार्‍या महाविद्यालयीन तरुणी, नागरिक, महिला अशा पाचजणांचा त्याने चावा घेतला. कुत्र्याला पकडण्यासाठी श्‍वानपथक बोलवण्यात आले. या पथकाने कसरत करीत कुत्र्याला पकडून नेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रत्येक चौकात कुत्र्यांचे कळप  फिरत असतात. यापूर्वी कुत्र्यांनी अनेक जणांवर हल्ला केला होता. काही बालकांचे लचके तोडले आहेत. चार बालकांचा यात बळीही गेला आहे. मात्र, महापालिकेला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात म्हणावे तसे यश आले नाही. अशा घटना घडल्या की कुत्री पकडून पुन्हा दुसरीकडे सोडण्यात येतात. 
दुसरीकडे कुत्र्यांच्या नसबंदीसाठी लाखो रुपये खर्च करूनही कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट शहरातील गल्ली-बोळात पाच-पन्‍नास कुत्र्यांची दहशतच दिसून येते. यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करीत असतात.

आज सांगली शहर पोलिस ठाण्यासमोर आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने 5 ते 6 जणांवर हल्ला केला. रस्त्यावरून महाविद्यालयीन तरुणी जात होत्या. त्यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने दोन वृद्ध महिला आणि नागरिकांवरही हल्ला केला.  हा  प्रकार एका  रस गाडीवाल्याने पाहिला आणि महापालिकेला कळविले. 

श्‍वान दंश प्रतिबंधक लसीचा तुटवडाच

एकीकडे कुत्र्यांचे हल्‍ले सुरू आहेत. दुसरीकडे महापालिकेकडे वार्षिक दरकरार संपल्याने ठेकेदाराने श्‍वानदंश प्रतिबंधक लसीचा पुरवठा बंद केला आहे.  परिणामी, दररोज 30 पेक्षा अधिक लसींची गरज असताना दहा-बारा लसी विकत घेऊन मनपा रुग्णालयात पुरविल्या जात आहेत. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.