Wed, Apr 24, 2019 12:34होमपेज › Sangli › सांगलीत कुत्र्यांसह मालकांचा महापालिकेवर मोर्चा

सांगलीत कुत्र्यांसह मालकांचा महापालिकेवर मोर्चा

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 19 2018 1:37AMसांगली : प्रतिनिधी

पाळीव कुत्र्यांवर महापालिकेने लागू केलेला पाच हजार रुपये कराचा अन्यायकारक ठराव तातडीने मागे घ्यावा, अशी  मागणी करीत श्‍वानप्रेमींनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. कराचा ठराव मागे घेतला नाही, तर महासभेत कुत्री सोडण्याचा इशारा यावेळी श्‍वानमालकांनी दिला.

प्रतिवर्षी कुत्र्यांसाठी पाच हजार रुपये कर द्यावा, असा अजब ठराव महासभेत आणला आहे. तो रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. हा अन्यायी कर रद्द न केल्यास महासभेत ही पाळीव कुत्री सोडू, असा इशाराही आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. 
येथील राजवाडा परिसरातून दुपारी बारा वाजता श्‍वानप्रेमी नागरिकांनी कुत्र्यांसह मोर्चा काढला. प्रत्येकाच्या हातात या अन्यायी प्रस्तावाचा निषेध करणारे फलक होते.  घोषणाही देण्यात आल्या. हा अनोखा व पहिलाच मोर्चा पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.  

नगरसेवक माने म्हणाले, महापालिकेत श्‍वानदंश खरेदीसह अनेक कामात बोगसगिरी सुरू आहे. जनतेने कराच्या रूपात दिलेला पैसा लाटला जातो. आता कुत्र्यांनाही टार्गेट करून प्रत्येकी 5 हजार रुपये वार्षिक कर लादण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यांना मनपा कोणत्या सुविधा देते म्हणून कर द्यायचा? अन्य राज्यात किंबहुना देशात कोठेही इतका मोठा कर पाळीव कुत्र्यांसाठी घेतला जात नाही, महापालिकेने कोणत्या आधारावर हा कर ठरवला? असा सवालही त्यांनी केला. 

आयुक्‍त खेबुडकर यांनी श्‍वानप्रेमींबरोबर चर्चा केली. श्‍वानप्रेमींच्या भावनांचा विचार केला जाईल. महासभेत जो निर्णय होईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही खेबुडकर यांनी दिली. 

आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, अ‍ॅनिमल सहाराचे अध्यक्ष अजित काशीद, सतीश वाघमारे, रोहन आपटे, गजानन कसबे, प्रशांत वायदंडे, रोहित बन्ने, विनायक बावधनकर, संदीप होरे, एम. डी. बोकील, सागर भुसारी, जयवंत माळी, संदीप भोरे, प्रशांत मातंग, महेश माने, मुस्तफा मुजावर, सचिन शिंगारे, उदय पुजारी, रोहित अंकलगी यांच्यासह श्‍वानप्रेमी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले  होते.