Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Sangli › महापालिकेचे विभाजन सहज शक्य

महापालिकेचे विभाजन सहज शक्य

Published On: Dec 24 2017 10:35PM | Last Updated: Dec 24 2017 10:35PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

समतोल विकासासाठी तीन शहरांची ओढून-ताणून केलेली महापालिका अपयशी ठरली आहे. त्याचे विपरीत परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. त्यामुळे सांगली, मिरज अशा विभाजनात अडचण काय? महापालिकेचे तातडीने विभाजन करून दोन्ही शहराच्या विकासातील अडथळे दूर करण्यात यावेत. यासाठी प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरचीही लढाई उभारू, अशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांनी व्यक्‍त केल्या.

विभाजन भ्रष्टाचारमुक्तीचा पर्याय : माजी आमदार दिनकर पाटील 

तीन शहरांची मानसिकता नसताना जबरदस्तीने महापालिका करण्यात आली. त्याला मी व हाफिज धत्तुरे यांनी आमदार या नात्याने विरोध केला. त्यानंतर विकासाला खर्‍या अर्थाने खीळच बसली. वास्तविक गुंठेवारीचा विळखा असल्याने माझ्या पुढाकाराने गुंठेवारीचा कायदा झाला. पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. आता तर एकूणच कारभाराची बजबजपुरी झाली. भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याला चाप लावण्यासाठी स्वतंत्र महापालिका हाच पर्याय आहे. यातून दोन्ही शहराच्या विकासाची कवाडेच खुली होतील.

दोघांचे भांडण; कुपवाडची हानी :माजी आमदार प्रा. शरद पाटील

माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या कृपेने तीन शहरांची ओढून-ताणून महापालिका केली. त्यानंतर 20 वर्षांत अधोगतीचाच प्रकार झाला. मिरजकरांची दादागिरी आणि सांगलीकरही त्याच माळेचे मणी. त्यामुळे कुपवाडवर नेहमीच विकासात अन्याय होत आला आहे. वास्तविक ग्रामीण रचना असलेल्या कुपवाडला स्वतंत्र आराखडा करून विकासाची गरज कोणीच लक्षात घेत नाही. त्यामुळे त्रिभाजन करून सांगली, मिरज महापालिका करा. पुन्हा एकदा कुपवाड नगरपालिकाच करा.

अंधाधुंद कारभाराला ब्रेक बसेल : माजी महापौर सुरेश पाटील

गेल्या 19 वर्षांत महापालिकेच्या नागरी सुविधाही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. उलट बकालपण आले आहे. पाच-सहा वर्षांत तर एकूणच बजबजपुरी झाली आहे. वास्तविक मिळणारे अनुदान, उत्पन्न पाहता समतोल विकास अशक्यच आहे. त्यासाठी दोन्ही स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सत्तासंघर्ष आणि खेळखंडोबा थांबेल. त्यादृष्टीने जनतेतून उठाव आणि शासनपातळीवर निर्णय होणे गरजेचे आहे. 

वल्गना नको; लढाही उभारू :माजी महापौर विवेक कांबळे

सांगली, मिरज व कुपवाड या शहरांचीच मानसिकता नसताना युती शासनाने महापालिका लादली. याचे परिणाम 19 वर्षांत दिसून आले आहेत. वास्तविक मिरज पॅटर्न निधी पळवतो म्हणून आमच्यावर टीका करीत बदनामी केली जाते. मिरज आमची अस्मिता आहे. आम्ही आमच्या शहराच्या विकासासाठी एकत्र आहोत. तुम्हाला कोण अडविले? तीन शहरांचा समतोल विकास हा एका महापालिकेकडून शक्य नाही. सांगली, मिरजेच्या स्वतंत्र महापालिका करा. त्यासाठी मिरजेला सावळी, सुभाषनगर, वड्डीसह अनेक गावे जोडता  येतील. ज्यांना -त्यांना विकासाचे मार्गही खुले होतील.त्यासाठी दोन्ही आमदारांनी नुसते न बोलता त्यासाठी पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी रस्त्यावरची लढाईही उभी करू. 

विकासाची मानसिकता हवी :- नगरसेवक शेखर माने

दोन स्वतंत्र महापालिका करण्याने विकास होणार नाही. तर विकासाभिमुख आणि तशी तळमळ असणारे नगरसेवक, पदाधिकारी हवेत. पदे मिळूनही अनेकांनी आपापल्या शहरांसाठी काय दिवे लावले? उलट मिरजेतील प्रस्थापित राजकारण्यांच्या खाबूगिरीमुळे मिरज शहर, पॅटर्न बदनाम झाला. त्यांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करीत आहोत. भाजी मंडई, रस्ता रुंदीकरण, विकास आराखड्यामध्ये आरक्षणे विकसित करणे, अशी कामे प्रलंबित आहेत. तीही मार्गी लावू. जनतेतून उठाव घडवून अशा विकासाला मारक नगरसेवकांना घरात बसवू.

नागरिकांची अपेक्षापूर्ती होईल : विजय हाबळे, माजी नगरसेवक

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांची ठेवण वेगळी आहे. नागरी सुविधांच्या गरजा वेगळ्या आहेत. वास्तविक सांगली, कुपवाडमधून ज्या तुलनेत कर गोळा होतो, त्या तुलनेत मिरजेतून होत नाही. पण निधी मात्र मिरजेला सर्वाधिक पळविला जातो. सांगली, कुपवाड एकत्र महापालिका करावी. मिरजेला अन्य गावे जोडून स्वतंत्र महापालिका करावी. त्याद्वारे ज्या-त्या ठिकाणचा निधी तेथेच खर्च होईल. नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होतील.

विभाजन हा विकासाचा राजमार्गच : स्वाभिमानी नेते, गौतम पवार 

भाजपचा समतोल विकासासाठी छोटी-छोटी राज्ये हा अजेंडा आहे. त्या धर्तीवर सांगली, मिरज स्वतंत्र महापालिका यादृष्टीने विकासाचा अजेंडा ठरू शकतो. वास्तविक दोन्ही शहरांचे प्रश्‍न वेगळे आहेत. राजकीय, सांस्कृतिक तसेच नागरी गरजांच्या मर्यादा वेगळ्या आहेत. जर शासन सांगली, मिरज आणि कुपवाड शहराला पाणी, ड्रेनेज, घरकुलासह सर्वच योजना वेगळ्या देत असेल तर केवळ नावापुरती एकत्र महापालिका काय उपयोगाची. त्यासाठी स्वतंत्र महापालिका करून राजकीय व सर्वच स्वातंत्र्य मिळेल. विकासाचा हा महामार्गच ठरेल.

कायदेशीर लढा उभारू :अ‍ॅड. अमित शिंदे,

सांगली जिल्हा सुधार समिती वास्तविक तीन शहरांची लादलेली महापालिका आहे. आता विस्तार पाहता स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे आहे. आतापर्यंत 20 वषार्र्चा अनुभव पाहता निधीची पळवापळवी, नियोजन चुकतच गेले आहे. येथील पूर्णपणे संस्कृती, गरजा, ठेवण वेगळी आहे. कुपवाड ग्रामीण तर सांगली, मिरज निमशहरी गावे.  

एकूणच अपुरा स्टाफ, कुवतीची माणसे नाहीत. दुर्दैवाने दोन्ही शहरांना सक्षम विकासाचे नेतृत्व लाभलेलेे नाही. उलट  भ्रष्टाचार आणि भांडणांमुळे प्रत्येक टर्म वादात अडकल्या आहेत. आता सक्षम विकासासाठी विभाजन हाच मार्ग आहे. त्यासाठी सुधार समितीच्या मार्फत कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करून लढा उभारू.

विभाजनच करेल बकालपण दूर :- काँग्रेस प्रवक्ते राजन पिराळे

तीन विभिन्न गरजा असणार्‍या शहरांची महापालिका करण्यास आम्ही सुरुवातीपासून विरोध केला होता. पण ऐकले नाही. त्याचे परिणाम म्हणून मनपा स्थापनेपासून तीनही शहरांना बकालपण आले आहे. दर पंचवार्षिक टर्म या विकासासाठी नव्हे भ्रष्टाचार, वाटोळ्यासाठीच येतात का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यातही गटबाजी आणि सत्तासंघर्ष गंभीर आहे. सांगली, मिरजेचा वाद कुपवाडलाही अडचणीचा ठरला आहे. गरजा आणि मर्यादा यांचा ताळमेळ प्रशासन घालू शकत नाही. त्यामुळे दोन स्वतंत्र महापालिका हाच पर्याय आहे. त्याद्वारेच बकालपण दूर होईल.

जिल्ह्याचा केंद्रबिदू : अ‍ॅड. प्रमोद भोकरे

जिह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू सांगली शहर आहे. पण अन्य ‘ड’ वर्ग महापालिका पाहता तीन शहरांमुळे विकास होऊ शकला नाही. पायाभूत सुविधाच मिळाल्या नाहीत, तर रस्ते नियोजन, स्वच्छ पाणी, रुंद रस्ते या सर्व समस्या 20 वर्षे आ वासून उभ्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी  उदासीनच आहेत. सत्तासंघर्ष आणि स्वार्थी राजकारणात सगळे अडकले आहेत. त्यामुळे आता सत्तासंघर्षाला विराम देण्यासाठी विभाजन गरजेचे आहे. दोन्ही शहरांच्या महापालिका या विकासाला पोषक ठरतील.

दुजाभाव मिटेल : ज्योती आदाटे

महापालिका झाल्यानंतर पैसा नेमका कोणत्या शहरासाठी वापरला जातो, हे समजत नाही. दोन्ही शहरातील नागरिक एकमेकांवर आरोप करीत असतात. त्यामुळे विभाजन झाले तर लक्ष केंद्रीत करता येऊ शकेल. सध्या दोन्ही शहरे भकास झाली आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा मात्र पत्ता लागत नाही.  तसेच दोन्ही शहरात दुजाभाव राहणार नाही. त्यामुळे सांगली आणि मिरज अशा दोन  स्वतंत्र महानगरपालिका करणे कधीही योग्य ठरणार आहे.