Fri, Apr 26, 2019 01:28होमपेज › Sangli › 2019 च्या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्‍त करू

2019 च्या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्‍त करू

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:53PMसांगली : प्रतिनिधी

तासगाव जिंकले, पलूस-कडेगाव जिंकले, जयंतरावांचे इस्लामपूर जिंकले. आता महापालिका जिंकून निष्क्रिय काँग्रेसवाल्यांकडून त्यांचे शेवटचे सत्ताकेंद्र हिसकावून घेतले. पृथ्वीराज चव्हाणांचे कराडही जिंकले. तरीही विरोधक प्रत्येक निवडणुकीत आम्ही जिंकूच अशा भोळ्या आशा ठेवून आहेत. यापुढे त्यांनी निव्वळ विजयाच्या आशेवरच रहावे. येत्या 2019 च्या निवडणुकीत आठपैकी आठ विधानसभा जिंकून जिल्हा शंभरटक्के काँग्रेसमुक्‍त करू, असा दावाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे भाजपच्या मेळाव्यात केला.

कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डन येथे भाजपच्या महापालिका विजयोत्सव मेळाव्यात ते बोलत होते.  वर्षानुवर्षे सत्तेतून काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्ह्याची वाट लावली आहे. त्यामुळे आता जनाधार त्यांच्यासोबत नाही. फक्‍त भाजपसोबत आहे. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा त्यांनी सत्कार केला. याप्रसंगी राज्य सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे महाराष्ट्र संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, राज्य उपाध्यक्षा नीत केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिलीप सूर्यवंशी, शरद नलावडे, सुरेंद्र चौगुले, मुन्ना कुरणे, सुरेश आवटी आदि उपस्थित होते.

ते म्हणाले, सांगलीच्या मनपा निवडणुकीने देशाच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. जनतेने आपल्याला विश्‍वासाने विकासासाठी सत्ता दिली आहे. महापौरांच्या खणभाग, नळभाग बालेकिल्ला असलेल्या प्रभाग 16 मध्ये नितीन शिंदे यांनी कडवी झुंज देवून भाजपला यश मिळवून दिले. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारुन भाजपला विकासासाठी संधी दिली आहे. त्यामुळे पारदर्शी विकासाची आपली कमिटमेंट आहे. लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देऊ. सांगलीला पुन्हा व्यापाराचे केंद्र, उद्योगांद्वारे रोजगार देणारे स्थान बनवू. ते म्हणाले, विरोधकांनी आता सर्वपक्षीय आघाडी करून भाजपला आव्हान देऊ, असा कांगावा सुरू केला आहे. पण मोदींविरोधात तुमचा पैलवान कोण हे जाहीर करावे. विरोधकांनी लालूप्रसाद, मुलायमसिंग, देवेगौडा की शरद पवार पंतप्रधानांचे उमेदवार हे एकमताने जाहीर करावे. 

आमदार गाडगीळ म्हणाले, भाजपला न भूतो न भविष्यती असा विजय सांगलीकरांनी दिला आहे. आमदार खाडे म्हणाले, आता मार्केट कमिटी, जिल्हा मध्यवर्ती बँक उरली आहे. ती सुद्धा लवकरच ताब्यात येईल. इनामदार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक विकासासाठी संपर्कात आहेत. 

महापालिकेचे सर्वाधिकार शेखर इनामदारांकडे

ना. पाटील म्हणाले, महापालिकेत संपूर्ण कारभार पारदर्शीपणे झाला पाहिजे. यासाठी भाजप शिस्तीनुसार सर्व अधिकार शेखर इनामदार यांना राहतील. तेच महासभा, सर्व सभांपूर्वी बैठका घेतील. विकासाच्या योजना, विकासकामांचे सर्वाधिकार त्यांना राहतील. आम्ही सर्वजण पाठबळ देऊ.