Thu, Jun 27, 2019 02:06होमपेज › Sangli › वाळवा पंचायत समितीचा कारभार चर्चेत

वाळवा पंचायत समितीचा कारभार चर्चेत

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 7:48PMइस्लामपूर : संदीप माने

वाळवा पंचायत समितीची मासिक सभा दरखेपेस ठराविक पद्धतीने चर्चा होऊन पार पडते  अशी चर्चा आता नागरिकांत होऊ लागली आहे. कारभाराचा प्रभाव दिसून येत नाही. तेच प्रश्‍न आणि अधिकार्‍यांची तीच ठरलेली उत्तरे. कार्यवाही मात्र शून्य. असा सारा कारभार चर्चेत आहे. पंचायत समितीची टोलेजंग आणि दिमाखदार इमारत आहे. इमारतीतील  सभागृह नामकरणावरून राजकारण चांगलेच तापले होते. मात्र सभागृहातील बैठक व्यवस्था सुमार दर्जाची आहे. खुर्च्यांची उंची एवढी जास्त आहे की सदस्यांना बसणे गैरसोयीचे होते.

सभागृहातील ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी आहे. त्यामुळे  कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे कोणालाच ऐकू येत नाही. परिणामी जवळ बसलेल्या अधिकार्‍यांची इतिवृत्त लिहिताना भंबेरी उडते. प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित असतात, मात्र त्यांनाही कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे असे विचारावे लागते. दोन-तीन वर्षांपासून बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा यावर चर्चा झाली आहे. मात्र याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. 

आता विकासकामांसाठीचा बहुतांश निधी ग्रामपंचायतीकडे  जात असल्याने   सदस्यदेखील उदासीन आहेत. अनेकदा ते पंचायत समितीकडे फिरकतही नाहीत. सभेवेळी काही सदस्यांचीच उपस्थिती असते. सदस्य सभेवेळी  त्यांच्या भागातील  प्रश्‍न उपस्थित करतात. मात्र अनेक अधिकारी बघतो, चौकशी करतो, पाहणी सुरू आहे,  कामाला सुरुवात होईल, असे म्हणून वेळ मारून नेतात. तोच कित्ता प्रत्येक सभेत गिरवला जातो.वर्षाच्या आत त्याच कामाला मंजुरी देऊन निधी मुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सदस्यांतून होत आहे. गटविकास अधिकार्‍यांचे पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. पंचायत समितीच्या कंपाऊंडलगतच अतिक्रमणे आहेत. त्याकडेही  दुर्लक्ष आहे.

अधिकारी घेतात परस्पर निर्णय...

लोकप्रतिनिधी म्हणून सदस्यांशी अधिकारी विचार विनिमय करीत नाहीत. अधिकारी सदस्यांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेतात. त्यांची कल्पनाही सदस्यांना नसते. यावरून अधिकारी व सदस्यांच्यात सभेत चांगलेच वादंग झाले होते.