Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Sangli › महापौर निवडीवर भाजपची आज चर्चा

महापौर निवडीवर भाजपची आज चर्चा

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

भाजप नगरसेवकांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कोअर कमिटीची बुधवारी बैठक होत आहे.  विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयात येथे सकाळी  साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. भाजपतर्फे महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यावर यावेळी चर्चा होणार  आहे. हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामधून आठ नगरसेविका इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला ही संधी मिळणार यावर  खल रंगणार आहे. अर्थात महापौर पदाची संधी देताना अन्य शहरांचा समतोल साधण्याबाबतही विचार होणार आहे. गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती, उपमहापौरपदांच्या संधीवरही चर्चा होणार आहे. 

महापौरपदासाठी पुन्हा भाजपकडून पक्षातील निष्ठावंत, की अनुभवी नगरसेविका  यापैकी कुणाला संधी द्यायची, याबाबत चर्चा सुरू आहे. महापौरपदासाठी सौ. संगीता खोत, अनारकली कुरणे, गीता सुतार, सविता मदने, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सरगर, नसिमा नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्या दृष्टीने प्रत्येकजणींने समर्थनासाठी व्यूहरचना केली आहे. त्यामुळे  कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा होणार आहे. 

या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार  सुधीर गाडगीळ व  सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर आदी उपस्थित आहेत.  भाजपचा महापालिकेतील कारभार सांभाळण्यासाठी सक्षम गटनेतेपदाचे आव्हान आहे. त्यादृष्टीनेही निष्ठावंत तसेच अनुभवाचा निकष लावण्यात येणार आहे. काँग्रेसची विरोधी पक्षनेते निवडीसाठी गुरुवारी (दि. 9) बैठक होणार आहे. या बैठकीस आमदार डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील हे  नगरसेवकांतून मते अजमावतील. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाचा फैसला आमदार जयंत पाटील लवकरच करणार आहेत.

नगरसेवकांचे गॅझेट झाले; महापौर निवड 18 ला?

निवडून आलेल्या 78 नगरसेवकांचे विभागीय आयुक्‍तांनी पक्षनिहाय गॅझेट तसेच त्यांच्या गटाची मंगळवारी नोंदणी केली. आता नगरसचिव के. सी. हळिंगळे हे बुधवारी सकाळी महापौर निवडीसंदर्भात प्रशासकीय प्रस्ताव घेऊन पुणे विभागीय कार्यालयात जाणार आहेत. प्रशासनाने निवडीसंदर्भात 18 तारखेचा मुहूर्त काढला आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किंवा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपैकी एकजणाची वेळ घेऊन त्यांची विभागीय आयुक्‍त नियुक्‍ती करतील. त्यानुसार निवड कधी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल.