Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Sangli › शिक्षक बदल्यांमधील गोंधळावर प्रहार

शिक्षक बदल्यांमधील गोंधळावर प्रहार

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:30PMसांगली ः प्रतिनिधी

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील गोंधळावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी टीकेचे जोरदार प्रहार केले. बदल्यांमधील त्रुटी, समानीकरणाचा उडालेला फज्जा, बदल्यांचा ‘खो-खो’ यावरून वादळी चर्चा झाली. ग्रामविकास सचिवांच्या निषेधाचा ठराव घेण्याची मागणी झाली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी हस्तक्षेप करून निषेध ठराव फेटाळला.

 दरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी बदल्यांचा प्रश्‍न सुटेल. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी 70 शिक्षकांवर कारवाई तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले. 

उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे  उपस्थित होतेे.  

जितेंद्र पाटील, महादेव दुधाळ, सरदार पाटील, सत्यजित देशमुख, प्रमोद शेंडगे, स्नेहलता जाधव व काही सदस्यांनी शिक्षक बदल्यांमधील त्रुटींवर आक्रमपणे प्रहार केले. शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक राहिला तरी शिक्षक बदल्यांचा घोळ कायम आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्‍न सुटण्याऐवजी तो अधिक जटील झाला आहे. जत तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे 330 आहेत. समानीकरणाने रिक्त पदे 85 आवश्यक असताना रिक्त पदे वाढतच चालली आहेत. जिल्ह्यात 78 शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. अन्य काही तालुक्यातही रिक्त पदांचे प्रमाण बिघडले आहे. अनेक शिक्षकांनी गंभीर आजाराची खोटी प्रमाणपत्रे जोडून बदलीचा लाभ घेऊन फसवणूक केली असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. 

टाळ्या वाजल्या; अध्यक्ष भडकले

जिल्हांतर्गत बदल्यांचे अधिकार राज्यस्तरावर नेऊन बदल्यांचा गोंधळ घातला असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. शेंडगे यांनी ग्रामविकास सचिवांच्या निषेधाचा ठराव मांडला.त्यावर गॅलरीतून काही शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर अध्यक्ष देशमुख भडकले.  

अध्यक्ष देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी ग्रामविकास सचिवांचा निषेध ठराव मांडण्यापासून सदस्यांना परावृत्त केले. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्‍न सुटेल. एकही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही. रिक्त पदांचे समानीकरण होईल, असा विश्‍वास त्यांनी दिला. सदस्यांच्या भावना शासनास कळविल्या जातील, असेही देशमुख यांनी सांगितले. 

दरम्यान बदलीच्या दोन याद्या राज्यस्तरावरून आलेल्या आहेत. बदल्यांच्या आणखी दोन याद्या येतील. ग्रामविकासच्या प्रभारी सचिवांशी चर्चा झाली असून दि. 14  जूनपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व त्रुटी दूर होतील. तालुकानिहाय रिक्त पदांच्या समानीकरणही होईल, असे राऊत यांनी सांगितले. 

खोटी माहिती, बोगस कागदपत्रे; शिक्षकांवर कारवाई
काही शिक्षकांनी बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याची तक्रार प्रमोद शेंडगे यांनी मांडली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेणार्‍या तसेच बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे बदलीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. शासनानेही तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

‘महाराष्ट्र शासन प्राथमिक शाळा’ असे नामकरण करा
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या जिल्हा परिषद स्तरावरून होणे आवश्यक आहे. पारदर्शीपणासाठी या बदल्या ऑनलाईन होण्यासही हरकत नाही. मात्र बदल्यांचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेऊन जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर गंडांतर आणले आहे. शासनाने आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळांऐवजी महाराष्ट्र शासन प्राथमिक शाळा असे नामकरण करावे, अशी भावना सदस्यंनी व्यक्त केली. जिल्हांतर्गत बदलीचे अधिकार जिल्हा परिषदस्तरावरच ठेवावेत, अशी मागणीही सदस्यांनी केली. 

वैद्यकीय रजा नाही; मात्र गंभीर आजाराचे प्रमाणपत्र 
मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, 70 शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे 100 टक्के बोगस आहेत. या शिक्षकांनी वैद्यकीय रजा काढल्याचे आढळून येत नाही. मात्र गंभीर आजाराचे दाखले जोडले आहेत. दोषी शिक्षकांवर कारवाई होईल. बोगस वैद्यकीय दाखले देणार्‍या डॉक्टरांचीही चौकशी होईल.