Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Sangli › केबलसाठी रस्तेखोदाई केल्याने ‘स्थायी’त संताप

केबलसाठी रस्तेखोदाई केल्याने ‘स्थायी’त संताप

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 8:16PMसांगली : प्रतिनिधी

शहरात नव्याने केलेल्या रस्त्यांची केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदाई सुरू केली आहे. खोदाई करून पुन्हा रस्ते दुरुस्त न केल्याबद्दल दिलीप पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत संताप व्यक्‍त केला. याप्रकरणी सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी कामे थांबविण्याचे आणि चौकशीद्वारे दंड वसुलीचे आदेश दिले. 

दरम्यान, दोन वर्षांहून अधिक काळ स्ट्रीट लाईट मटेरियलची फाईल लटकल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आयुक्‍तांनी सायंकाळी 4 वाजेपर्यंत फाईल मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. दिलीप पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे खड्ड्यांत असलेले रस्ते नुकतेच महापालिका तसेच शासन निधीतून झाले आहेत. त्याची देखभाल-दुरुस्तीची ठेकेदारांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. असे असताना प्रशासनाने पुन्हा रिलायन्स कंपनीला केबल खोदाईसाठी परवाना देण्याचा घाट घातला आहे.

ते म्हणाले, अनेक सभांमध्ये अभियंता सतीश सावंत यांना केबलसाठी रस्ते खोदाईस परवानगी न देण्याचे आदेश दिले होते. बोअरद्वारे खोदाई न करता केबल टाकण्याची परवानगी दिली होती. पण  सांगलीवाडी व सांगलीत अनेक ठिकाणी नव्या रस्त्यांवर केबल खोदाई सुरू आहे. तेथे काम झाल्यावर पॅचवर्क न करता चरी माती टाकून तशाच सोडल्या आहेत. यापूर्वी वीज कंपनीकडून केबल टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न केल्यानंतर 2 कोटीऐवजी 3.20 कोटी रुपये मिळाले. आताही केबल कपन्यांकडून पैसे घेऊन तो पैसा पॅचवर्क न करता पगारासाठी उधळला जात आहे. हा सर्व कारभार थांबविण्याचे तसेच या कारभाराला जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश सातपुते यांनी दिले.

दिलीप पाटील, शिवराज बोळाज म्हणाले, शहरात स्ट्रीटलाईट मटेरियलची 2 वर्षे फाईल पडून आहे. 1.76 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर नसल्याने साहित्यच मिळत नाही. चार-दोन कामे वगळून 34 कामांनाच मंजुरी दिली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही आयुक्‍तांनी सह्या केल्या नाहीत. यावर दुपारपर्यंत फाईल मार्गी लावण्याचा निर्णय झाला.रोहिणी पाटील म्हणाल्या, संजयनगर येथील धोत्रेआबा घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. फक्‍त पाणी कनेक्शनसाठी लोक प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी वाटप रखडले आहे. श्री. सातपुते यांनी तत्काळ कामे पूर्ण करून घरकुले वाटपाचे प्रशासनाला आदेश दिले.

Tags : Sangli, diggerring, newly, created, road, cable network