Sun, May 19, 2019 22:55होमपेज › Sangli ›

अंबकमध्ये अपघातात देवराष्ट्रेचे दोघे ठार

अंबकमध्ये अपघातात देवराष्ट्रेचे दोघे ठार

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 2:01AMदेवराष्ट्रे : वार्ताहर

अंबक (ता. कडेगाव) येथे  कार (एमएच 10, बीए 966) व मोटारसायकल (एमएच 10, बीई 8317) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात येथील विलास बंडू महिंद  (वय 42) व  संगीता भाग्यवंत गवाळे (वय 47)  ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः महिंद व गवाळे मोटारसायकलने कडेगावहून अंबकमार्गे देवराष्ट्रेकडे येत होते. अंबक रस्त्यावर मोटासायकलला समोरून येणार्‍या कारने जोरदार धडक दिली. धडकेत मोटारसायकलचालक पंधरा ते वीस फूट लांब फेकला गेला. महिला रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या 15 फूट रुंदीच्या नाल्यावरून पलीकडे जाऊन पडली.

अपघातात महिंद यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. गवाळे याही गंभीर जखमी झाल्या होत्या. मोटासायकलचा चक्‍काचूर झाला होता.  अपघातानंतर  कारमधील चालक व महिला पसार झाले असे पोलिसांनी सांगितले. सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी कर्मचार्‍यांसह  घटनास्थळी  धाव घेतली.  ग्रामस्थांच्या मदतीने  जखमींना चिंचणी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. नंतर  त्यांना कराड येथील दवाखान्यात नेले. मात्र वाटेतच महिंद व गवाळे यांचा मृत्यू झाला.चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

देवराष्ट्रेवर शोककळा

 संगीता गवाळे या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करीत होत्या.त्यांच्या पतीचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. महिंद यांचीही परिस्थिती गरीबीची असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.गावावर शोककळा पसरली आहे.  तीन मुली झाल्या अनाथ या अपघातात मृत झालेल्या गवाळे यांना पाच मुली आहेत.त्यापैकी दोघींची लग्ने झाली आहेत. अन्य तीन मुली शिक्षण घेत आहेत. वडिलांच्या नंतर आईही सोडून गेल्याने या तीनही मुली अनाथ झाल्या आहेत.