Fri, Feb 22, 2019 11:40होमपेज › Sangli › मिरजेत प्रस्थापितांचा पराभव धक्‍कादायक

मिरजेत प्रस्थापितांचा पराभव धक्‍कादायक

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 8:37PMमिरज : जे. ए. पाटील

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 7 मध्ये भाजपने काँग्रेसला आणि प्रभाग क्र. 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच धोबीपछाड दिली. या निवडणुकीत माजी महापौर किशोर जामदार, विवेक कांबळे आणि जयश्री कुरणे या प्रमुखांना पराभव पत्करावा लागला. किशोर जामदार आणि इद्रिस नायकवडी यांचे गट एकमेकांविरुद्ध लढले नसते तर कदाचित राजकीय चित्र बदलले असते.

भाजपने शहरातील सर्व प्रभागात उमेदवार दिले होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटप करुन प्रभाग वाटून घेतले होते. प्रभाग क्र. 7 काँग्रेसला सोडण्यात आला. आणि प्रभाग क्र. 20 राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला. नव्या प्रभाग रचनेमुळे 1985 पासून नगरपालिका आणि महापालिकेवर आपली सत्ता गाजविणारे किशोर जामदार यांना सुरक्षित प्रभाग मिळाला नाही.  त्यांना दुसर्‍या प्रभागात जाण्याची वेळ आली. किशोर जामदार स्वत: प्रभाग क्र. 7 आणि त्यांचे चिरंजीव करण जामदार प्रभाग क्र. 5 मधून उभे राहिल्याने जामदार यांची ताकद विभागली गेली. प्रभाग क्र. 5 मधून करण जामदार विजयी झाले असले तरी किशोर जामदार यांना गेल्या 33 वर्षाच्या राजकारणात प्रथमच पराभव सहन करावा लागला आहे. किशोर जामदार यांचा 152 मतांनी पराभव झाला. जामदार यांना आपण विजयी होणार याबाबत मोठा आत्मविश्‍वास होता. 

परंतु, राजकीय खेळी करुन विजय मिळविण्यात ते अपयशी ठरले. नगरपालिका आणि महापालिकेत नगराध्यक्ष, महापौर यासह गटनेता अशी अनेक पदे भूषवूनही त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्यावर आता आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. गणेश माळी यांच्यासारख्या  नवख्या उमेदवाराकडून जामदार यांचा झालेला पराभव धक्कादायक ठरला आहे.राष्ट्रवादी  काँग्रेसमधून  भाजपमध्ये आलेले आनंदा देवमाने यांनी स्थायी समितीचे सभापती असलेले बसवेश्‍वर सातपुते यांचा 1357 मताधिक्क्यांनी पराभव करुन या प्रभागात आपले वर्चस्व आहे, हे दाखवून दिले आहे. जनता दलातून भाजपमध्ये आलेल्या संगीता खोत यांनीही पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. या निवडणुकीत प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या गायत्री कल्लोळी यांनी  जयश्री म्हारगुडे यांचा 1719 मताधिक्क्याने पराभव केला. या प्रभागात सुरुवातीस काँग्रेसला आघाडी मिळाली. परंतु नंतर भाजपने काँग्रेसवर मात करुन सर्वच चारही जागा जिंकल्या.

प्रभाग क्र. 20 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी महापौर विवेक कांबळे, जयश्री कुरणे आणि रेखा सूर्यवंशी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच धोबीपछाड दिली. विवेक कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेंद्र थोरात यांनी केवळ 7 मतांनी पराभव केला. थोरात यांनी गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून या प्रभागामध्ये विविध कामांच्या माध्यमातून आपले बस्तान बसविले होते. यावेळी विवेक कांबळे यांचा अल्पमताने झालेला पराभव चांगलाच धक्कादायक आहे. जयश्री कुरणे यांचा संगीता हारगे यांनी पराभव करुन पुन्हा विजय आपल्याकडे खेचला आहे.  अत्यंत चुरशीने झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती पारधी यांना नवखा प्रभाग असतानाही विजय मिळाला. यावेळी डॉ. महादेव कुरणे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधला होता. म्हणून त्यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु मतदारांनीच त्यांना पुन्हा एकदा नाकारले आहे.