Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Sangli › दर घसरल्याचा फटका; कांद्याची आवक कमी

दर घसरल्याचा फटका; कांद्याची आवक कमी

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचा दर घसरल्याने सोमवारी शेतकर्‍यांनी सौदा बंद पाडला होता. सांगली बाजार समिती सभापतींच्या मध्यस्थीने सौदा पूर्ववत सुरू झाला; पण शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळाला नाही. परिणामी, मंगळवारी मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी होती. क्‍विंटलला 900 ते 1850 रुपये दर होता. 

फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी सुमारे तेरा हजार पोती (7 हजार 600 क्‍विंटल) कांद्याची आवक झाली होती. शनिवारपेक्षा दीडपट जादा आवक झाल्याने दर घसरले होते. क्‍विंटलला 600 ते 1900 रुपये दर होता. अपेक्षित दर न निघाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सौदा बंद पाडला होता. सांगली बाजार समितीचे सभापती सभापती दिनकर पाटील यांनी अडते, खरेदीदार, शेतकरी यांची बैठक घेऊन सौदे पूर्ववत सुरू केले; मात्र दरात सुधारणा झाली नाही. त्याचा परिणाम मंगळवारी आवकेवर झाला. मंगळवारी सुमारे 6 हजार पोती  (सुमारे 3600 क्‍विंटल) कांद्याची आवक होती. कांद्याला क्‍विंटलला 900 ते 1850 रुपये दर मिळाला. 

सांगली : विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटकडील हमाली दरवाढीसंदर्भात मंगळवारी चर्चा अपूर्ण राहिली. बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. 

फळे व भाजीपाला मार्केटकडील हमाली दरवाढ कराराची मुदत संपून नऊ महिने झाले आहेत. नवीन करारासाठी हमाल पंचायतने मागणी केली आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी बैठक बोलावली होती. सभापती दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर, हमाल पंचायतचे विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर उपस्थित होते. बाजार समिती सभापतींची हमाल पंचायत प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा झाली. अडते, खरेदीदार व्यापार्‍यांशी चर्चा होऊ शकली नाही. बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.