Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Sangli › ‘कर्जमाफी’: त्रुटी यादीतील 19463 शेतकरी अपात्र

‘कर्जमाफी’: त्रुटी यादीतील 19463 शेतकरी अपात्र

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 10:21PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत माहितीतील त्रुटींची दुरुस्त यादी जिल्हा बँकेने शासनाला सादर केली आहे. 21 हजार 324 शेतकर्‍यांपैकी 1 हजार 861 शेतकरी पात्र ठरले आहेत. उर्वरित 19 हजार 463 शेतकरी अपात्र ठरले आहेत. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी शासनाने निश्‍चित केलेल्या निकषात बसत नसल्याने हे शेतकरी अपात्र ठरले आहेत. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’ साठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यात 87 हजार 523 शेतकर्‍यांना 182 कोटींचा लाभ मिळाला आहे. 26 हजार 494 शेतकर्‍यांना ओटीएस अंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे. 

कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन लिस्ट’चे चार टप्पे झाल्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांच्या कर्जासंदर्भातील माहितीतील त्रुटी, चुकांच्या दुरुस्तीसाठी शासनाने जिल्हा बँकेकडे 21 हजार 324 शेतकर्‍यांची यादी व माहिती पाठविली होती. यादीची तपासणी, दुुरुस्ती करून ती शासनाकडे पाठविली आहे. या यादीतील 1 हजार 861   पात्र ठरले असून 19 हजार 463 शेतकरी अपात्र ठरले आहेत. 

या कारणांमुळे अपात्र

दि. 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत वाटप झालेल्या कर्जाची दि. 30 जून 2016 पर्यंत थकबाकी राहिली असेल व ती दि. 31 जुलै 2017 पर्यंत कायम राहिली असेल तरच ते कर्ज कर्जमाफीस पात्र ठरते. मात्र या कालावधीनंतर थकित राहिलेल्या अनेक शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली होती. ते शेतकरी निकषात बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कालावधीत कर्जवाटप झालेल्या कर्जाची वसुली दि. 31 जुलै 2017 पर्यंत झाली असल्यास संबंधित शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरतात. या निकषात न बसणारे अपात्र ठरलेआहेत. 

राज्यस्तरावर माहितीचा ताळमेळ न लागल्याने 40 हजार 515 शेतकर्‍यांची यादी शासनाने दि. 15 जानेवारी रोजी जिल्हा बँकेला पाठविली होती. ही यादी जिल्हा बँकेची संबंधित शाखा व संबंधित विकास सोसायटीत प्रसिद्ध केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. तथापि त्यांना अद्याप कर्जमाफी/प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही, अशा शेतकर्‍यांनी  विकास सोसायटीशी संपर्क साधावा. प्रसिद्ध केलेली यादी पहावी. या यादीत नाव असल्यास आवश्यक कागदपत्रांसह योग्य माहिती विकास सोसायटीस तातडीने सादर करावी. दि. 3 फेब्रुवारी 2018 पर्यंत सोसायटीशी संपर्क करणे आवश्यक आहे.कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.