होमपेज › Sangli › मिरजेत तीनच बटने दाबून मतदाराचे पलायन

मिरजेत तीनच बटने दाबून मतदाराचे पलायन

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:02PMमिरज : शहर प्रतिनिधी

येथील एका मतदाराने आज निवडणूक यंत्रणेची चांगलीच पळापळ केली. सकाळी दहा वाजता येथील आयडियल इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रात जाऊन तीनच उमेदवारांना मतदान केले आणि केंद्रातून पळ काढला. त्यामुळे सुमारे अर्धा तास यंत्र थांबले होते. या प्रकारामुळे यंत्रणेला चांगलाच त्रास झाला. शहरात काही ठिकाणी किरकोळ वाद झाले पण मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने गोंधळ उडाला.

मिरजेत अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सुरुवातीच्या एक तासात 10 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र चुरशीने मतदान झाले. पाऊस नसल्याने मतदानावर परिणाम झाला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांना आणण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होती.त्या मतदाराने केंद्रात जाऊन तीन उमेदवारांना मतदान केले. मात्र पुढचे मतदान न करताच तो तेथून निघून गेला. चार वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे यंत्र बंद न पडता तसेच सुरू राहिले. चौथे मतदान करायचे कसे हा प्रश्न यंत्रणेला पडला. त्याचा पत्ता शोधून पोलिस व कर्मचारी त्याच्या घरी गेले. त्यावेळी तो घरी होता.

पोलिस घरी गेल्यावर त्यांनी ‘मला स्वच्छतागृहात जायचे आहे’ असे सांगितले. शेवटी स्वच्छतागृहाच्या दारात पोलिस पाळत ठेवून बसले. तो बाहेर आल्यावर ‘तुला काय सांगायचे ते निवडणूक अधिकार्‍यांना सांग’, असे सांगत कसेबसे त्याला मतदान केंद्रावर आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर भली मोठी रांग लागली होती. तो अधिकार्‍यांना म्हणाल्या, ‘तुम्ही सरकारी काम करताना किती लोकांना ताटकळत ठेवता याची जाणीव आता तुम्हाला झाली का?’ असा सवाल केला. रांगेतील मतदारांनी त्याला विनंती करून मतदान करण्यास भाग पाडले. त्याने मतदान केले आणि मगच मतदान प्रक्रिया पुढे सुरू झाली.