Mon, Nov 19, 2018 09:11होमपेज › Sangli › मिरजेत घातक शस्त्रांसह पंढरपूरच्या दोघांना अटक

मिरजेत घातक शस्त्रांसह पंढरपूरच्या दोघांना अटक

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:28PMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील उत्तमनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री कोयता, कट्यार अशा घातक शस्त्रांसह पंढरपूरच्या दोघांना अटक करण्यात आली. सराईत गुन्हेगार प्रवीण ऊर्फ तात्या देवीदास शिंदे (वय 26), अमोल दिलीप शिंदे (वय 28, दोघे रा. अनिलनगर झोपडपट्टी पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत. ते अशी हत्यारे घेऊन मिरजेत का आले होते, याचा तपास सुरू असल्याचे महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले. 

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गांधी चौकी पोलिस ठाण्याचे पोलिस शहरात गस्त घालत होते. उत्तमनगर परिसरात कारमधून दोघेजण संशयितरित्या फिरत होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याजवळ कट्यार, कोयता अशी शस्त्रे सापडली. त्यापैकी प्रवीण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी हद्दपारही करण्यात आले होते.

दुसरा संशयित अमोल शिंदे हा गाडी चालवत होता. तो कारचालक आहे की गुन्हेगार, याचाही तपास सुरू आहे. त्या दोघांवर भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घातक हत्यारे व कार जप्त केली आहे. याबाबत पोलिस हवालदार मुलुकचांद नदाफ यांनी फिर्याद दिली आहे.