Sat, Apr 20, 2019 17:57होमपेज › Sangli › चांदोली अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

चांदोली अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 8:32PMशिराळा : विठ्ठल नलवडे

सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या  चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटकांची आता गर्दी होऊ लागली आहे. चांदोली धरणाचा विस्तीर्ण जलाशय, अभयारण्यातील स्थळे ही पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.  

सांगली जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेशसह देशभरातून चांदोली अभयारण्याकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.  

चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी एकदिवसाची परवानगी मिळते. मात्र अभयारण्यात राहण्यासाठी परवानगी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभयारण्यातील स्थळे पर्यटकांना पाहता येतात. मोटारसायकलला परवानगी नाही.   चारचाकी गाडी घेऊन अभयारण्यात जाता येते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. पर्यटकांना हव्या असतील तर खुल्या छताच्या जीप्स् भाड्याने मिळू शकतात. चांदोली अभयारण्याचे क्षेत्र 18 हजार 745 हेक्टर अर्थात 308.97  चौ. कि. मी. आहे.  या अभयारण्याचा समावेश 39 व्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला आहे.

अभयारण्यात गवे, बिबटे, रानडुक्कर, भेकर, शेकरू, अस्वल आढळतात. अंजनी, जांभूळ, पिसा, हिरडा, चांदाडा, बहावा, करंडा, नरक्या, आवळा, पांगारा, आंबा, फणस, उंबर, करवंद, शिकेकाई, मुरूड, सर्पगंधा, नरक्या, चंदन अशा वनस्पती आहेत. बांबूची, वेलाची बेटे आहेत. ताडांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोर, लांडोर, रानकोंबडी, घणेरा, बहिरी ससाणा, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, घनछडी, सर्पगरुड पक्षी आहेत. अजगर, नाग, घोणस, मण्यार, घोरपड, सरडे आहेत.

चांदोली अभयारण्यात इको-झोन क्षेत्रात असलेला प्रचितगड पर्यटकांना अभयारण्याच्या मार्गाने पाहता येत नाही. मात्र नायरीमार्गे त्या गडावर जाता येते. चार जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रचितगड किल्‍ला आहे.  स्वराज्याचा खजिना या किल्ल्यावर होता असे मानतात. अत्यंत दुर्गम व चढण्यास कठीण असा हा किल्‍ला आहे. याचा टेहळणी किल्ला असा उल्‍लेख आहे. 

गडावर भवानी मंदिर, राजवाड्याचे अवशेष, तोफा, पाण्याची कुंडे आहेत. या गडावर चढण्यासाठी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी शिड्या केल्या आहेत. कंदाहार धबधब्यास आता पाणी कमी प्रमाणात आहे.