Mon, Jul 22, 2019 00:45होमपेज › Sangli › आमणापूर येथे मगरीची अज्ञातांकडून हत्या

आमणापूर येथे मगरीची अज्ञातांकडून हत्या

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:59PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील आमणापूर-धनगाव रस्त्यावर एका मगरीची अज्ञातांनी हत्या केली आहे. याबाबत वन विभागास वर्दी देण्यात आली. त्यानंतर पलूसचे वनरक्षक प्रकाश पाटील हे तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी मृत मगरीचा पंचनामा केला. ही मगर चार फूट लांबीची होती. तसेच ही मगर नर होता आणि ती तीन दिवस उपाशी होती, असे समजते.

अनुगडेवाडीजवळ ओढ्यावरील पुलाखाली रविवारी सकाळी एका प्लॅस्टिकच्या पोत्यातून मगरीचे शेपूट बाहेर आल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यावेळी ही मगर जिवंत आहे की मृत  आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. नंतर या मगरीला मारून कोणी तरी पोत्यात भरून या पुलाखाली टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. 

आज पलूस येथील शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यात मगरीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन रहाणे यांनी मगरीचे शवविच्छेदन केले. तिच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने घाव घालून तिला मारण्यात आल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. मगरीचा मुत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 

यावेळी  वनक्षेत्र अधिकारी  नितिन काळेल, वनरक्षक पाटील, राजेश पाटील उपस्थित होते. या मगरीच्या हत्येचा तपास सुरू असून हे  कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे  वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.