Tue, Apr 23, 2019 22:23होमपेज › Sangli › घरफोडी, वाटमारी करणारी टोळी जेरबंद

घरफोडी, वाटमारी करणारी टोळी जेरबंद

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:47PMकुपवाड : वार्ताहर

शहरासह विस्तारित भागात आणि  मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्‍याच ठिकाणी घरफोडी व जबरी चोरी करणार्‍या सराईत चोरट्यांच्या टोळीस  गुरुवारी पोलिसांनी गजाआड केले. कुपवाड पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.संशयितांकडून दोन एअरगन, एक धारदार चाकू तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल व दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. ही   माहिती मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.  धीरज पाटील यांनी दिली. 

राजू हुसेन मुल्ला (वय 40, रा. आंधळी, ता. पलूस), राकेश पंडित पुजारी (वय 30,  रा. वाल्मिकी आवास, सांगली) या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा या टोळीत समावेश आहे.  या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत.कुपवाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  प्रमुख प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोंजारी व इंद्रजीत चेळकर यांचे पथक गुरुवारी दुपारी कुपवाड शहरातील अहिल्यानगर परिसरांत पेट्रोलिंग करीत होते. 

यावेळी संशयास्पदरित्या दोघे तरुण फिरताना दिसले. त्यांच्याकडे  चौकशी करून झडती घेतली. त्यावेळी एकाकडे लहान एअरगन आणि दुसर्‍याकड धारदार चाकू सापडला.  त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. दोघांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरज ग्रामीण, कुपवाड व गांधी चौकी पोलिस हद्दीत घरफोड्या व जबरी चोरी केल्याची  कबुली दिली.तसेच गुन्ह्यात वापरलेली आणखी एक मोठी एअरगन कर्नाळ रस्त्यालगत असलेल्या एका शेतात पुरलेली पोलिसांना काढून दिली. त्यांनी यापूर्वी  जुना बुधगाव रोडवर काशिनाथ नारायण धुमाळ याला अडवून  जबर मारहाण व दुखापत केली होती.  त्याची  मोटरसायकल (एम.एच.10-ए.व्ही-0016) व रोख 1500 रुपये जबरीने चोरून नेले होते. 

तसेच नितीन वसंत बोरकर व त्यांचा मुलगा निखिल  यांना अडवून चाकूचा धाक दाखवून  दोन महागडे मोबाइल, चांदीच्या दोन अंगठ्या व रोख चार हजार रुपये जबरीने चोरले होते. अजिंक्यनगर येथे जगन्नाथ कल्लापा कदम यांना अडवून  15 हजार रुपये काढून घेतले होते. काननवाडीतील ओढ्यात काकड़वाडीचे चंद्रकांत आप्पासाहेब पाटील यांना शस्त्राने मारून जखमी केले होते. तानंग फाटा येथे सागर गंगाराम कांबळे व त्यांच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये किंमतीच्या  सोन्याच्या दोन चेन हिसडा मारून पळवल्या होत्या. कुमठे फाटा नजिक रस्त्याकड़ेला लघुशंकेसाठी थांबलेल्या काकड़वाडीतील उत्तम शिवाजी पाटील यांना चाकूचा धाक दाखवून एक तोळ्याची सोन्याची चेन, मोबाइल व मोटारसायकल असा सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरला होता.  मिरजेत एस.टी. वर्कशॉपजवळ नम्रता मीलन कांबळे (रा.कमानवेस, मिरज) व त्यांचे नातेवाईक  यांना अडवून चाकूचा धाक दाखवून  एक मोबाइल व 4 हजार 400 रुपये पळवले होते.या सर्व गुन्ह्यांची संशयितांनी पोलिसांच्या प्राथमिक तपासात कबुली दिली आहे.   या संशयितांच्याविरोधात मोका अंतर्गत (संघटित गुन्हेगारी) व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल  करूनकठोर कारवाई करणार असल्याचे डॉ. धीरज पाटील यांनी सांगितले.