Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Sangli › गुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : जयंत पाटील

गुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : जयंत पाटील

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:16AMइस्लामपूर : वार्ताहर

मोदी लाटेत पक्ष सोडून गेलेल्यांपैकी कोणी पुन्हा पक्षात येऊ इच्छित असेल, तर स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. मात्र, भाजपप्रमाणे येईल त्या बदनाम आणि गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भविष्यातील पक्ष प्रवेशाचे धोरणच स्पष्ट केले. आमदार पाटील म्हणाले, राष्ट्रवादी  काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असून तो पश्‍चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, हा विरोधकांचा अपप्रचार  आहे. राष्ट्रीय नेते  शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी, महिलांसह समाजातील सर्व घटकांना सातत्याने संधी दिली आहे. तसेच आमच्या पक्षाची केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातच नव्हे; तर राज्याच्या सर्व भागात ताकद आहे.  

ते म्हणाले , मोदी लाटेत मोठ्या शहरात आमच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला, हे खरे आहे. म्हणून  त्या भागातील आमचा पक्ष संपला, असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या पक्षाच्या हल्लाबोल यात्रेतील जाहीर सभांना जसा ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला, तितकाच प्रतिसाद आमच्या शहरातील जाहीर सभांनाही मिळाला आहे. आमचे त्या-त्या शहरातील कार्यकर्ते त्या-त्या शहरातील विविध प्रश्‍नांवर संघर्ष करीत आहेत. तेथील जनता त्यांना साथ देत आहे. यातून निश्‍चितपणे वेगळे चित्र तुम्हाला दिसेल.