Wed, Jul 17, 2019 10:46होमपेज › Sangli › चांदोली अभयारण्यातील झोळंबी पठाराला तडे

चांदोली अभयारण्यातील झोळंबी पठाराला तडे

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 8:42PMसांगली ः गणपत पवार

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे खास आकर्षण असणार्‍या झोळंबी पठाराला भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे पठाराचे वेगवेगळे तुकडे होऊ लागले आहेत. यापूर्वी असे काही तुकडे  जमीनदोस्त  झाले आहेत. परिणामी पठाराचा  काही भाग संपुष्टात आला आहे. सध्या पडत असलेल्या भेगा कमी न झाल्यास  या परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार आहे. 

सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात या अभयारण्याचा पसारा फुलला आहे. अभयारण्याची स्थापना 1985 मध्ये झाली. 2006 मध्ये राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा मिळाला. 2010 -2011 मध्ये राष्ट्रीय सह्याद्री व्याघ्रप्रकल्प म्हणून याला मान्यता मिळाली. 

चांदोली अभयारण्याचे क्षेत्रफळ 317.67 चौरस किलोमीटर आहे. अभयारण्यात हिरडा, जांभूळ, करवंद, आवळा, आंबा, माड, उंबर, फणस, पांगिरा अशा सदाहरित वनस्पतींसह विविध प्रकारचे जवळपास 1 हजार वृक्ष आढळतात. महागणेश, राखीधनेश, सातभाई, स्वर्गीय  नर्तक, चंडोल पक्षी आढळतात. या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे की, येथे फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात. त्यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फु लपाखरांच्या जातींचा समावेश आहे.

सध्या चांदोली अभयारण्यात पाण्याची  मोठी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील प्राणी मानवी वस्तीत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय, अभयारण्याला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यामुळे सुधारणा करण्यास मर्यादा आल्या आहेत. पाण्याअभावी वनस्पती सुकू लागल्यामुळे अन्नसाखळी सुरळीत चालण्यास अडथळे येत आहे. 

राष्ट्रीय दर्जा असलेल्या या अभयारण्याचा अपेक्षित विकास झालेला दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटन विकासासाठीही मर्यादा आल्या आहेत. मात्र, हे पठार  सध्या भग्‍नावस्थेत आहे. या पठाराच्या विकासाबाबत कोणत्याच प्रकारचा आराखडा नाही. तसेच पर्यटकांचा राबताही कमी आढळतो. या पठारावर जाण्याचे धोक्याचे असल्याने पर्यटक इथे जाणे टाळतात.

गेल्या काही वर्षांपासून या पठाराच्या चहुबाजूंचे मोठे कडे ढासळत आहेत. मागील काही वर्षांत भेगा पडून अनेक कडे जमीनदोस्त झाले आहेत. यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वन्य प्राणी, पक्षीही नष्ट झाले आहेत. अवाढव्य अशा या पठाराची वाताहत अजूनही सुरुच आहे. दगडांचे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दगडावर मोठ-मोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत. प्रत्येक वर्षी उन्हाळा व पावसाळ्यात मोठ-मोठे भाग ढासळत आहेत. या ढासळलेल्या दगडांमुळे  झाडे, फुले, प्राणी यांचे नुकसान होत आहे.