होमपेज › Sangli › कल्याणमधून दोघांना अटक

कल्याणमधून दोघांना अटक

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:38AMसांगली : प्रतिनिधी

येथे बसस्थानकाजवळील एका दुकानात बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना कल्याणमधून अटक करण्यात आली. प्रेमविष्णू रोगा राफा (वय 26, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (33, आनंदवाडी, कल्याण) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन हजारांच्या आणखी 29 बनावट नोटा, 3 मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. याप्रकरणी राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (28, कल्याण, ठाणे) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. 

येथे बसस्थानकाजवळील एका दुकानात गुरुवारी (दि. 23) खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर या संशयितांनी तिथे दोन हजारांची बनावट नोट दिली. रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य तिघे पसार झाले होते. सिंह चौकशीला प्रतिसाद देत नव्हता. मित्रांनी मला फसविले आहे, इतकेच तो सांगत होता. त्यामुळे त्याचे तीन साथीदार हाती लागणे महत्त्वाचे होते. त्यामुळे उपनिरीक्षक गणेश शिंदे यांचे पथक तपासासाठी कल्याण (ईस्ट) ला गेले होते. त्यावेळी प्रेमविष्णू राफा आणि नरेंद्र ठाकूर यांना अटक केली. मात्र, टोळीतील चौथा साथीदार मनीष (पूर्ण नाव नाही) हा अद्यापही पसार आहे. 

अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस हवालदार बिरोबा नरळे, नाईक सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांनी ही कारवाई केली. दरम्यान, दोघांनाही  तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयितांकडे कसून चौकशी

दोन हजारांच्या बनावट नोटा शहरात खपविण्याचा प्रयत्नात असलेल्या या टोळीने त्या  कोठून आणल्या, त्या सांगलीतच का खपविण्याचा प्रयत्न होता, या टोळीत आणखी किती जण आहेत, याची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली. तसेच टोळीतील सिंह हा मोलमजुरी करतो. राफा खासगी नोकरी तर ठाकूर हमाली करतो. तिघांचीही  एकमेकांशी ओळख आहे. या टोळीचा म्होरक्या वेगळाच कोणी असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.