Thu, Jul 18, 2019 20:45



होमपेज › Sangli › भ्रष्टाचारमुक्‍त, पारदर्शी विकास करू

भ्रष्टाचारमुक्‍त, पारदर्शी विकास करू

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 8:21PM



सांगली : प्रतिनिधी

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी कारभाराला तिलांजली देत जनतेने भाजपला महापालिकेत विकासाची संधी दिली आहे. त्यानुसार पालिकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त करू, असे आश्‍वासन खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह भाजप नेत्यांनी दिले. महापालिकेत सत्तांतरानंतर भाजप-महापौर निवडीनंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते. 

तब्बल 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपला महापालिकेत संधी मिळाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासाला निधी कमी पडणार नाही. गेल्या 50 वर्षांत झाला नाही एवढा विकास आम्ही दोन वर्षांत करून शहराचा चेहरा- मोहरा बदलू, असा विश्‍वास कोअर कमिटीच्या या नेत्यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे आठवडाभर राजकीय दुखवटा पाळण्यात येत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवड साधेपणाने  पार पडली. 

नूतन महापौर सौ. संगीता विठ्ठल खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,  मनपा सभागृह नेते युवराज बावडेकर, सुरेश आवटी  उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, 20 वर्षांपासून महापालिकेचा भ्रष्ट कारभार मतदारांनी अनुभवला आहे. वास्तविक सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने महापालिका पोखरलेली होती. शहराचे वाटोळे करणार्‍या काँग्रेस आघाडीच्या कारभार्‍यांना हटवून जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. 

निवडणुकीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार भाजपचा पहा, असे म्हणत मतदारांनी बहुमताने भाजपाला सत्तेची संधी दिली आहे. त्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीने मायक्रोप्लॅनिंग केले. पक्षाने विश्‍वासाचे चेहरे दिले आहे.

ते म्हणाले, मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ कारभारामुळे सांगली महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली आहे. आता श्री. फडणवीस यांनीही महापालिकेत पारदर्शी व गतिमान कारभाराची अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली आहे. त्यासाठी 100 कोटी मंजूर केले आहेत.  नजिकच्या काळात आणखी निधी मिळणार आहे.    

आमदार गाडगीळ म्हणाले, सांगलीच्या जनतेने भाजपवर विश्‍वास दाखवला आहे तो निश्‍चित सार्थ करून दाखवू. शासनाकडून विकासासाठी येणारा शंभर टक्के निधी त्या-त्या कामासाठीच खर्च होईल. सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असे उत्तम शहर बनवू.

आमदार खाडे म्हणाले, जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखवला आहे. निवडणुकीपूर्वीच सरकारने आम्हा दोन्ही आमदारांना शहर विकासासाठी 55 कोटी दिले होते. आता महापालिकेत सत्ता येताच शंभर कोटी मंजूर केले आहेत.   

माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले, शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मतदारांनी भाजपकडे सत्ता दिली आहे. त्यानुसार आता भ्रष्टाचारमुक्‍त आणि शंभर टक्के शहराचा विकास करण्यासाठी कोअर कमिटी कटिबध्द आहे.  

मकरंद देशपांडे म्हणाले,  विकासाचा खेळखंडोबा थांबविण्यासाठीच जनतेलाच बदल हवा होता. त्यासाठीच भाजपला जनतेने बहुमत दिले आहे. जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीही आम्ही पेलणार आहोत.  वर्षभरात शहराच्या विकासाला वेग आलेला  दिसेल.पृथ्वीराज देशमुख म्हणाले, नागरिकांनी भाजपवर विश्‍वास टाकला आहे. गेल्या 50 वषार्ंत जे झाले नाही तो विकास   वर्षभरात  दिसेल. भाजप असा कारभार करेल, ज्यामुळे यापुढे पन्नास वषार्ंत महापालिकेवर फक्‍त भाजपचीच सत्ता असेल. 

शेखर इनामदार म्हणाले, भाजपच्या केंद्र आणि राज्याच्या भ्रष्टाचारमुक्‍त गतिमान विकासाला जनतेने महापालिकेतूनही साथ दिली आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारामुळे आतापर्यंत शहराचे वाटोळे झाले होते. हे चित्र जनतेनेच बदलले आहे. जिल्हा चार वर्षांत भाजपमय झाला आहे.  केंद्र, राज्य आणि महापालिका एकसुराने विकास होईल. हे करताना आम्ही जर कुठे चुकलो तर जनतेने जरूर कान धरावा. पण चांगल्या कामाला पाठिंबा द्यावा.

निवडीनंतर तत्काळ प्रशासनासोबत बैठक

महापौर, उपमहापौर निवडीनंतर खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ,  सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह कोअर कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली. आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून विविध योजनांसाठी आवश्यक निधी आणि एकूणच अपुर्‍या योजनांच्या पूर्ततेसह विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त सुनील पवार, स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निवडीत सोशल इंजिनिअरिंग साधले : पृथ्वीराज देशमुख

पदाधिकारी निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख  म्हणाले,  सध्या आरक्षणासंदर्भात राज्यात आंदोलने सुरू आहेत. सरकारही याबाबत सकारात्मक आहे. याच पार्श्‍वभूमीवर भाजपने महापालिका सत्तेत पहिल्याच पदाधिकारी निवडीत सोशल इंजिनिअरिंग साधले आहे. पहिल्या महापौरपदी सौ. संगीता खोत यांच्यारुपाने धनगर समाजातील महिलेला प्रतिनिधीत्व दिले आहे. उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी, गटनेतेपदी युवराज बावडेकर यांच्यारूपाने मराठा समाजाला नेतृत्व दिले आहे. अन्य पदाधिकारी निवडीतही समतोल साधून समतोल विकास साधला जाईल.