Fri, Jan 18, 2019 10:56होमपेज › Sangli › गुंड टारझन हद्दपार

गुंड टारझन हद्दपार

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

नगरसेवक दाद्या सावंत याच्या खुनातील मुख्य संशयित, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गुन्हे दाखल असलेला गुंड सचिन टारझन ऊर्फ सचिन पांडुरंग जाधव (वय 40, रा. कोल्हापूर रस्ता, सांगली) याला वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत सांगली शहर पोलिसांनी प्रस्ताव दाखल केला होता. 

सचिन टारझन याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रे बाळगणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शासकीय कर्मचार्‍यांना मारहाण करणे, दहशत माजविणे, मारामारी यासारखे दहा गंभीर गुन्हे सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मारहाणीबाबत त्याच्याविरोधात फिर्याद मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यांची माहिती काढली. 

त्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या परवानगीनंतर त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव मिरजेचे प्रांताधिकारी विकास खरात यांच्याकडे दाखल केला होता. त्यावर महिनाभर सुनावणी सुरू होती. मंगळवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खरात यांनी त्याला एक वर्षासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. 

दाद्याच्या खुनानंतर चर्चेत

गुंड सचिन टारझन पूर्वीपासूनच गुन्हेगारी जगतात कार्यरत होता. मात्र नगरसेवक दाद्या सावंत याचा सिव्हील चौकात भरदिवसा खून केल्यानंतर तो विशेष चर्चेत आला होता. या खून खटल्याबाबत अजूनही न्यायालयात सुनावणी सुरू आहे.