Thu, Nov 15, 2018 17:58होमपेज › Sangli › ठेकेदाराची दुसर्‍या ठेकेदाराला मारहाण

ठेकेदाराची दुसर्‍या ठेकेदाराला मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत मंगळवारी दुपारी आटपाडी तालुक्यातील एका ठेकेदाराने तालुक्यातीलच दुसर्‍या ठेकेदाराला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या फ्री स्टाईल मारहाणीत ठेकेदाराचा चेहरा सुजला होता. अर्थ विभागासमोर हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप करून मारणार्‍या ठेकेदाराला बाजूला केले; अन्यथा जबर मारहाणीत दुसरा ठेकेदार बेशुद्ध पडला असता. 

जिल्हा परिषदेत बांधकाम आणि अर्थ विभागासमोर ठेकेदारांची नेहमी वर्दळ असते. मंगळवारी दुपारी एक ठेकेदार अर्थ विभागासमोरून मोबाईलवरून बोलत जात असताना दुसरा ठेकेदार तिथे आला आणि त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. 

ठेकेदाराला खाली पाडून  तो लाथा मारत होता. जोरात आरडाओरड सुरू झाल्याने जिल्हा परिषदेतील शंभरावर कर्मचारी घटनास्थळी धावत आले. या कर्मचार्‍यांनी मारणार्‍या ठेकेदाराला रोखले. 

हे दोन ठेकेदार मजूर सहकारी सोसायटी अथवा सुशिक्षित बेरोजगार अभियंते नाहीत. काही मजूर सोसायट्यांकडील कामे ते सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून करतात. कामावरून त्यांच्याच वाद झाला असावा, अशी चर्चा होती. शिव्या देशील का, असे तावातावाने बोलत ठेकेदार दुसर्‍या ठेकेदाराला मारत होता, असेही काहींनी सांगितले. मारणारा ठेकेदार हा आटपाडी पंचायत समितीचा माजी पदाधिकारी असल्याचीही चर्चा होती. दरम्यान या मारहाणीच्या प्रकाराने जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. 

Tags : sangli,  Zilla Parishad, contractor, beat, another contractor,


  •