Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Sangli › महापालिकेचे बांधकाम परवाने झेरॉक्सवर

महापालिकेचे बांधकाम परवाने झेरॉक्सवर

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेतील नगररचना विभाग बांधकाम परवाने झेरॉक्स फॉर्मवर देत असल्याचा कारभार शुक्रवारी चव्हाट्यावर आला. त्यामुळे प्रशासनाचा ऑनलाईन दाखल्यांचा दावा फोल ठरला आहे. 

झेरॉक्स फॉर्मद्वारे बांधकाम परवान्यांचा कागदोपत्री बोगस कारभार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. याबद्दल  त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. फॉर्म संपल्याने झेरॉक्सवर काम चालवत असल्याचा खुलासा प्रशासनाने केला. हा अनागोंदी कारभार सुधारावा. अन्यथा धडा शिकवू, असा इशारा नगरसेवकांनी दिला. नगररचना विभाग बांधकाम परवाने आणि पूर्णत्वाचे दाखले (कंप्लीशम सर्टिफिकेट) वेळेत देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी काहीजणांकडून अडवणूक केली जाते. एजंटांचा कारभार चालतो, अशाही तक्रारी होत्या. 

त्याला पर्याय म्हणून आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी आता शासन निर्णयानुसार ऑनलाईन बांधकाम परवान्यांसाठी अर्ज करावेत, असे असे आवाहन केले  होते. कोणत्याही परिस्थितीत दहा दिवसांत बांधकाम परवाने दिलेच पाहिजेत. अन्यथा संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करू, असा इशाराही गेल्या आठवड्यात दिला होता.

परंतु महापालिकेची अर्जासंबंधातील ऑनलाईन यंत्रणा सुरूच नाही. दुसरीकडे बांधकाम परवान्यासाठी महापालिकेकडून अर्जाचे झेरॉक्स काढून त्यावर शिक्का  मारून ते नागरिकांना दिले जात होते. हे समजताच काँग्रेस नगरसेवक संतोष पाटील, उत्तम साखळकर, युवानेते अमर निंबाळकर व  आपचे याकूब मणेर नगररचना विभागात गेले. अधिकारी, कर्मचार्‍यांना जाब विचारला. 

त्यावेळी नगररचना सहसंचालक व अधिकारी जागेवर नव्हते. तेथील कर्मचार्‍यांनी बांधकाम परवाने ऑनलाइन केले जाणार असल्याने आम्ही फॉर्म छापले नाहीत, असा खुलासा केला. गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही झेरॉक्स प्रतीवर  शिक्का मारून देत आहोत असे  सांगितले.  निंबाळकर, साखळकर आक्रमक झाले. ते म्हणाले, हे झेरॉक्सचे फॉर्म ग्राह्य मानून तुम्ही पक्के बांधकाम परवाने देणार का? कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांच्या सुचनेनुसारच ते काम करीत असल्याचे सांगितले.