Tue, Mar 19, 2019 03:53होमपेज › Sangli › ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’च्या जागेवर काँग्रेस विजयी

‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’च्या जागेवर काँग्रेस विजयी

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:25AMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाच्या ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ या सर्वसाधारण मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप (करमाळा, जि. सोलापूर) बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार संपतराव पाटील (ता. वाळवा, जि. सांगली) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर शुक्रवारी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप झाले. सर्वसाधारण मतदारसंघातील 16 पैकी 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 9 जागांसाठी निवडणूक लागली आहे. महिला, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गासाठी आरक्षित 5 जागांसाठी 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 225 मतदार आहेत.  21 मार्चला मतदान व 23 रोजी मतमोजणी आहे. 

लक्षवेधी लढत बिनविरोध
सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तीन जिल्ह्यासाठी सर्वसाधारण गटातून 1 जागा असून 15 मतदार आहेत. या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त होती. मात्र सूचक, अनुमोदक अभावी दोनच उमेदवारांना अर्ज भरता आले. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील समर्थक उमेदवार संपतराव पाटील व काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात लक्षवेधी लढतीचे संकेत होते. मात्र, प्रदेशस्तरावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत समझोता झाला. प्रदेश राष्ट्रवादीने संपतराव पाटील यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले.  पाटील यांच्या अर्ज माघारीनंतर जगताप यांचा एकमेव अर्ज राहिला व ते बिनविरोध विजयी झाले. 

ओबीसी मतदारसंघातून सांगली बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संतोष पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संतोष पाटील (सांगली), सुभाष आकरे (गोंदिया), संदीप काळे (वर्धा), शामसुंदर गायगोले (अमरावती), विकास पाटील (जळगाव) हे पाच उमेदवार ओबीसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 225 मतदार आहेत.
महिला, अनुसूचित जाती-जमाती, व्हीजेएनटी मतदारसंघातून सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा एकही उमेदवार नाही. यवतमाळ, जळगाव, नाशिक, लातूर, अमरावती, बुलढाणा, ठाणे, नागपूर जिल्ह्यातील उमेदवार आहेत.