Tue, Sep 25, 2018 10:36



होमपेज › Sangli › विदेशात जाणार्‍यांना यापुढे सक्‍तीचे प्रशिक्षण

विदेशात जाणार्‍यांना यापुढे सक्‍तीचे प्रशिक्षण

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:51PM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून बोगस एजंटांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित दोषींवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.  त्या शिवाय परदेशात  जाणार्‍यांना त्या ठिकाणी होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती  परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,  परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट, व्हिसा आणि विदेशातील भारतीयांच्या अडचणी आदी प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या 3 कोटी 11 लाख भारतीय परदेशात आहेत. कोणताही भारतीय नागरिक परदेशात अडचणीत असेल, तर त्यांना भारतात आणण्याची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय घेते. त्याच्या राहण्याची, प्रवासाचीही व्यवस्था करते. गेल्या काही वर्षांत अडचणीत असलेल्या 90 हजार लोकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बोगस एजंटावर कारवाईसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विदेशात जाताना त्या ठिकाणच्या भारतीय दुतावासाचा संपर्क क्रमांक, पत्ता तुमच्याकडे असायलाच हवा. ई मायग्रेट पोर्टलवर नोंदणीकृत एजंट, बोगस एजंट, विदेशात असलेल्या नोकरदारांची यादी  दिलेली आहे. विदेशात जाणार्‍यांची माहिती दररोज या पोर्टलवर दिलेली असते. अधिकृत एजंटाकडून जे परदेशात जातात त्यांच्यासाठी प्रवासी भारतीय विमा योजना आहे. दहा लाखांपर्यंतचा हा विमा आहे. परदेशात गेलेल्यांच्या येथील मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. 

ते म्हणाले, दिल्लीत असलेल्या सर्व मराठी अधिकार्‍यांचा एक मंच स्थापन केला आहे. प्रत्येक महिन्यात याची बैठक होते. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आदि या मंचावर येऊन गेले आहेत. महाराष्ट्राचा प्रभाव आणि प्रतिभा देशपातळीवर वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे प्रकल्प आहेत, ते पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील खासदारांसाठी खासदार मित्र योजना राबवली जात आहे. एका खासदारांबरोबर एक मराठी अधिकारी काम करतील. खासदार दत्तक गाव योजनेप्रमाणे अधिकार्‍यांसाठी आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे.