Thu, Jun 27, 2019 14:01होमपेज › Sangli › प्रभाग 15 मध्ये मतदानावेळी गोंधळ; सहाजणांवर गुन्हे

प्रभाग 15 मध्ये मतदानावेळी गोंधळ; सहाजणांवर गुन्हे

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

मतदान प्रक्रियेवळी बुधवारी प्रभाग 15 मध्ये काहीजणांनी गोंधळ घालून व्यत्यय आणला. याबद्दल सहाजणांवर गुन्हे दाखल केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, दिवसभरात मतदान प्रक्रियेरम्यान चिथावणी देणे, प्रलोभन दाखविणारे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आदी प्रकारांबद्दल सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहितेअंतर्गत एकूण 41 गुन्हे दाखल केले आहेत.

ते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा गेल्या महिन्याभरापासून राबते आहे. याअंतर्गत प्रचारादरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे 34  गुन्हे दाखल केले होते. काल मतदान प्रक्रियेतही कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली होती. 

खेबुडकर म्हणाले, प्रभाग 15 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या संशयावरून उमेदवार व समर्थकांनी गोंधळ घातला. जमावबंदी तसेच 100 मीटरच्या आत केंद्रामध्ये प्रवेशबंदी असतानाही उमेदवारांसह काहीजण मतदान केंद्रात घुसले. त्यांनी बेशिस्त वर्तन करून मतदान प्रक्रियेत अडथळा आणला. याबद्दल काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण, इब्राहीम जमादार, सुयश वळवडे, फिरोज पठाण, जयश्री पाटील आदींसह सहाजणांवर कलम 253 कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सतीश शिवाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे. 

ते म्हणाले,  मतदानादिवशी एकूण 7 गुन्हे दाखल कण्यात आले आहेत. यामध्ये ईव्हीएम मशिनसोबत फोटो काढणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे,  जुन्या बुधगाव रोडवरील बायपास रस्त्यावर डमी ईव्हीएम मशीनमार्फत प्रचार करणे, पैशाचे प्रलोभन दाखवून  मतदारांना चिथावणी देणे अशा पध्दतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.    

मतमोजणी केंद्रावर मोबाईलबंदी

खेबुडकर म्हणाले, मतमोजणी केंद्रावर उमेदवार, राजकीय कार्यकर्ते, नेते यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मोबाईल आढळून आल्यास तो जप्त करुन निवडणूक आचारसंहिता भंगाचा तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.