Thu, May 23, 2019 21:16
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › जिल्ह्यात कडकडीत बंद;  चक्‍काजाम

जिल्ह्यात कडकडीत बंद;  चक्‍काजाम

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:30PMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला गुरुवारी सांगली, मिरज शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बंद कडकडीत होता. कार्यालये, दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. जिल्ह्यातील गावागावांत चक्‍काजाम आंदोलन झाले. रास्ता रोकोमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. एकही एस.टी. बस रस्त्यावर धावली नाही. अनेक ठिकाणी टायर पेटवून रस्ते अडवले होते. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगलीत स्टेशन चौकात आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. 

बंदला सांगली जिल्ह्यात  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद अभूतपूर्व होता. सांगलीत स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे दिवसभर धरणे आंदोलन झाले. मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजीही झाली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवा नेते विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील तसेच विविध नेते, कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. 

मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, प्रशांत भोसले, रोहितकुमार शिंदे, नगरसेवक उत्तम साखळकर, नगरसेवक अभिजित भोसले, दिग्विजय मोहिते, प्रा. पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील,  अंकित पाटील, प्रथमेश पाटील, आशा पाटील, वैशाली भोसले, ज्योती चव्हाण, लता डफळे, नेत्रा कुरळपकर यांच्यासह मराठा युवक, युवती, महिलांसह समाजबांधव उपस्थित होते. 

मिरजेत बंद, रास्ता रोको

मिरज शहरासह तालुक्यातही बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. मराठा युवकांनी मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. शहरातील कार्यालये, दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. महाराष्ट्र व कर्नाटकची एकही बस रस्त्यावर धावली नाही. मिरज-पंढरपूर रस्त्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ मराठा तरूणांनी रास्ता रोको आंदोलन केले. मिरज पूर्व भागातील गावे कडकडीत बंद होती. 

मिरज पश्‍चिम भागातही बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर रस्त्यावर अंकली फाटा तसेच सांगलीवाडीजवळ टोल नाक्याशेजारी  रास्ता रोको आंदोलन झाले. अंकली फाट्यावर आलेल्या रुग्णवाहिकेला तातडीने वाट मोकळी करून देत मराठा क्रांती मोर्चाची शिस्त आंदोलकांनी पाळली. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सर्वत्र प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात होता.  

मिरज-पंढरपूर महामार्ग शांत

कवठेमहांकाळ येथे बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील गावागावात तरूणांनी मोटारसायकल रॅली काढून गाव बंद ठेवले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले. मिरज-पंढरपूर महामार्गावर प्रथमच मोठा शुकशुकाट होता.

जत कडकडीत बंद; मोर्चा, रॅली

जत तहसील कार्यालयावर मोेर्चा काढण्यात आला. शहरातून रॅली काढण्यात आली. महाराणा प्रताप चौकात सभा झाली. होस्पेट येथे जत-चडचण  रास्ता रोको आंदोलन झाले.  तालुक्यात सर्वत्र शंभर टक्के बंद होता. एसटी बस बंद होत्या.  महाविद्यालये, शाळांना सुटी दिली होती. 

तासगाव 100 टक्के बंद

तासगाव शहर व तालुक्यात बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात रास्ता रोको आंदोलन झाले.  शहरातील सर्व दुकाने, कार्यालये बंद होती. आमदार सुमनताई पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.   तहसीलदार यांना निवेदन दिले. 

आटपाडी तालुक्यात चक्काजाम

आटपाडी शहरासह तालुक्यातील गावे कडकडीत बंद होती. गावागावात रॅली काढण्यात आली. ‘रास्ता रोको’द्वारे अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. 

विट्यात ठिय्या; तालुक्यात बंद

विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन झाले. खानापूर तालुक्यात गावागावात कडकडीत बंद होता. गार्डी येथे रस्त्यावर टायर पेटवून दिली होती. 

पलूस-कडेगावमध्ये उत्स्फूर्त बंद

कडेगाव व पलूस तालुका उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद होता. वांगी, हिंगणगाव येथे मोर्चे निघाले. वांगीजवळ सांगली-सातारा रस्त्यावर ठिय्या आंदोलन झाले. आमदार मोहनराव कदम उपस्थित होते. विटा-कराड रस्त्यावरही ठिय्या आंदोलन झाले. 

सांगलीत सायंकाळी व्यवहार पूर्ववत सुरळीत

मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी पुकारलेला बंद सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आला. येथील स्टेशन चौकातील ठिय्या आंदोलनही मागे घेण्यात आले. त्यामुळे सायंकाळी शहरातील कामकाज पूर्ववत सुरळीत सुरू झाले. बहुसंख्य दुकाने उघडण्यात आली होती. 

पुणे-बेंगलोर महामार्गावर ट्रकवर दगडफेक

वाळवा तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इस्लामपूरसह तालुक्यात सर्व व्यवहार बंद होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर वाघवाडी फाटा येथे ट्रकवर दगडफेक झाली. तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून दिले होते.आंदोलकांनी पुणे-बेंगलोर महामार्गासह तालुक्यातील प्रमुख मार्गांवर ठिय्या आंदोलन करून रस्ते रोखून धरले. शिराळ्यासह तालुक्यात बंद कडकडीत होता. शिराळा येथे चौकात ठिय्या आंदोलन झाले.

पलूसमध्ये युवकाने हाताची नस कापली

पलूस येथील मध्यवर्ती चौकात राजकुमार देसाई या युवकाने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. रक्‍त आल्यानंतर अन्य युवकांनी देसाई या युवकास तातडीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. युवकावर उपचार करण्यात आले.  

मार्केट यार्ड बंद; 

दूध संकलन ठप्पसांगलीत वसंत मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत कडकडीत बंद होता.सुमारे 6.25 कोटींची उलाढाल ठप्प होती. शहर, गावांमध्ये रास्ता रोको आंदोलन झाले. त्यामुळे जिल्ह्यात दूध संकलन ठप्प होते.