Sun, Aug 18, 2019 14:39होमपेज › Sangli › कौलगेत चिकन गुनियाची साथ, गावात भितीचे वातावरण

कौलगेत चिकन गुनियाची साथ, गावात भितीचे वातावरण

Published On: Jun 22 2018 1:32PM | Last Updated: Jun 22 2018 1:32PMमांजर्डे : वार्ताहर

कौलगे (ता.तासगाव) येथे गेल्या  चार -पाच दिवसापासून चिकनगुनिया सदृश साथ पसरली आहे. गावभागात 33 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत. साथ आटोक्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असला तरी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

शासकीय अहवालात 33 रुग्ण आढळले असले तरी खाजगी रुग्णालयात 100 च्या आसपास रुग्णांणी उपचार घेतल्याची माहिती डॉक्टर मुलाणी यांनी दिली आहे.  कौलगे गावात मागील चार पाच दिवसापासून अनेक रुग्णांना अचानक ताप येणे , सांधे दुखणे याची बाधा झाली असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. गावात 135 घरे, वस्ती भागात  200 घरे आहेत. केवळ गावातभागातच रुग्ण आढळले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देवुन सुद्धा गावास कोणी भेट दिली नाही याबाबत ग्रामस्थानीं नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. तसेच उघड्यावर, डबक्यात पाणी साचलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डास तयार झाले आहेत. यामुळे ही साथ आल्याची शक्यता आहे.

साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने  स्वच्छता मोहीम राबविली आहे. स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाय योजना, जनजागृती करण्यात येत आहे. सर्व रुग्णांना तात्काळ वैदयकीय सेवा व ग्रामपंचायतीचे  सहकार्य यामुळे साथ आटोक्यात आल्याचे चिंचणी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पी. पी.सोनवले यांनी सांगितले.