Sun, May 19, 2019 22:13होमपेज › Sangli › चांदोली धरणाचे दरवाजे उघडले: वारणा नदी पात्राबाहेर (Video)

चांदोली धरणाचे दरवाजे उघडले: वारणा नदी पात्राबाहेर (Video)

Published On: Jul 15 2018 2:04PM | Last Updated: Jul 15 2018 11:00PMसांगली/वारणावती :  वार्ताहर

जोरदार पाऊस व धरण  82 टक्के भरल्याने चांदोलीतून रविवारी पाणी सोडण्यात आले. सकाळी धरणाचे चार वक्राकार दरवाजे उघडून 2100 क्युसेक्स पाणी सोडले. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून सायंकाळपर्यंत 10 हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. कोयना धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु असल्याने हे धरण 66.31 टीएमसीपर्यंत भरले आहे. कृष्णा नदीची पाणी पातळीही वाढत आहे. सांगली पाणी पातळी 17.5 फुटापर्यंत वाढली आहे. 

शिराळा तालुक्यात व धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी धरण वेगाने भरले आहे. धरण 28 टीएमसी भरले.

पाण्याने सांडवा पातळी ओलांडल्याने रविवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे चारही दरवाजे 0.50 मीटर उचलून 2100  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून  592 व  उच्चस्तर द्वारातून 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सर्व मिळून 3492  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. दोन तासांच्या टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून सायंकाळपर्यंत  तो 10 हजार क्युसेक्सपर्यंत करण्यात आला.  

मुसळधार पाऊस त्यातच धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली  आहे.अनेक छोटे पूल, बंधारे बुडाले आहेत. नदीकाठच्या ओढ्यांना पूर आला आहे. नदीजवळ असणार्‍या रस्त्यांवर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे,  असा इशारा  प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 810 मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण 1324 मिलिमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 514 मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे.

दरम्यान, कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. नवजा, महाबळेश्‍वर, कोयना परिसरात  शनिवार सांयकाळ ते रविवार सकाळ आठ वाजेपर्यंत (24 तासात) 100 ते 150 मिमी पेक्षा जादा पाऊस पडला आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. हे धरण 65 टीएमसी (62 टक्के)भरले आहे. धोम धरण 6 टीएमसी  भरले आहे. कण्हेर धरण 5 टीएमसी भरले आहे. 

जिल्ह्यात पावसाने आज काहीप्रमाणात उघडीप दिली. काही ठिकाणी  रिमझिम पाऊस पडला.  कृष्णा नदीचे पाणीही  वाढू लागले आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी बहे पुलाजवळ 13 फूट होती. ताकारीजवळ 24  फूट, भिलवडीत 15 फूट, सांगलीत आयर्विन पुलाजवळ 17.5 फूट पाणी होते.  

जिल्ह्यात  शनिवार सांयकाळ ते रविवार सकाळ आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे :  शिराळ्यात 29, इस्लामपूर  येथे  7.4 ,   पलूस तालुक्यात 1.5, कडेगाव तालुक्यात 2.6, तासगाव तालुक्यात 2.9,  मिरज तालुक्यात 6.9, विटा-खानापूर भागात  1.6, आटपाडीत 1, कवठेमहांकाळला 1.6, जतमध्ये 0.1  मिमी पाऊस पडला. 

जिल्ह्यात अतिवृष्टी व  नदीकाठी सावधानतेचा इशारा 

प्रादेशिक हवामान विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्रात तीन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यात  सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चांदोली धरणातून पाणी सोडल्याने  वारणा नदीच्या पाणी पातळीत  लक्षणीय वाढ होणार आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.