Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Sangli › जयंत पाटील यांच्यासमोर परिवर्तनाचे आव्हान

जयंत पाटील यांच्यासमोर परिवर्तनाचे आव्हान

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 11:57PMइस्लामपूर : अशोक शिंदे

केंद्रात व राज्यात सत्ता नसल्याच्या काळात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या खांद्यावर पडलेली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. राज्य मंत्रिमंडळात अर्थ, गृह व ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी उमटविलेला ठसा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीला परिवर्तनाची व पुन्हा दिग्विजयाची दिशा देण्याचे आव्हान जयंत पाटील यांच्यासमोर असणार आहे. 

राज्यात भाजप-सेना युतीच्या सरकारनंतर जेंव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले, त्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा आरोप होत होता. त्या बिकट परिस्थितीतून आपल्या अभ्यासू, दूरदृष्टी, संयमी व पारदर्शी कारभारातून जयंत पाटील यांनी कोलमडलेली अर्थव्यवस्था अनेक मूलभूत निर्णयातून  रुळावर आणली होती. कदाचित हाच धागा पकडून आता काँग्रेस व राष्ट्रवादी  हे पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेपासून दूर असताना राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी म्हणून जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली असावी.

आजपर्यंत वाळवा तालुक्यातून विविध राजकीय पक्षातील ताकदीच्या व दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामध्ये तत्कालीन जनता पक्षातून लोकनेते राजारामबापू पाटील, समाजवादी पक्षातून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा पाटील अशा अनेकांनी वेगवेगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अचानक राजकारणात उतरलेल्या उच्चशिक्षित  जयंत पाटील यांची कारकीर्द एका वेगळ्या अर्थाने अनोखी ठरली आहे. 1984 नंतर राजारामबापू कारखान्याचे अध्यक्षपद, कारखाना पुरस्कृत 48 कोटी रुपयांच्या 32 पाणी योजनेतून 50 हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी काढलेली पदयात्रा हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही   महत्त्वपूर्ण टप्पे. नंतरच्या काळात त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1985 ला इस्लामपूर नगरपरिषदेत सत्ता, त्यानंतर वाळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांची सहाव्यांदा झालेली निवड आजतागायत सलग राहिली आहे. 

1990 ते 2014 अशा सलग तीस वर्षाच्या काळात त्यांनी दोन ‘हॅट्ट्रिक’ करत सगळ्या निवडणुका जवळपास लाखभराच्या  मताधिक्क्याने जिंकल्या. तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर सर्वाधिक काळ 10 वर्षे अर्थसंकल्प सादर करणारे ते राज्यातील एकमेव नेते आहेत.

अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून काम करताना कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दलाचे सक्षमीकरण व मनोधैर्य वाढविण्यासाठी खास प्रयत्न, ग्रामविकास खाते सांभाळताना इको व्हिलेज उपक्रमातून राज्यात कोट्यवधीची वृक्ष लागवड, समृध्द ग्रामविकास योजना ते देशात ग्रामविकाससाठी राज्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस अशा असंख्य कामांची श्रेयनामावली लाभलेल्या आ. जयंत पाटील यांना आता तितक्याच अनुभवाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पेलावी लागणार आहे. 

सुसंस्कृत, उच्चशिक्षित, संयमी, अभ्यासू व दूरदृष्टी अशा गुणांचा समन्वय असलेल्या आ. जयंत पाटील यांनी राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीतून वाटचाल करावी लागणार आहे. अर्थात त्यांचे नेतृत्व ग्रामीण भागातून, सहकारातून, कारखानदारीतून, बँकिंग, वस्त्रोद्योग, शिक्षण,  क्रीडा, कला या स्तरावरून अनुभवाने विकसित झाले आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी सुरू केलेला ‘जयंत दारिद्य्र निर्मूलन अभियान’ हा देखील एक राज्यातील अनोखा उपक्रम ठरला आहे.

दि. 1 डिसेंबरला यवतमाळ येथून सुरू झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल यात्रेत अग्रभागी असण्यापासून ते इस्लामपूरच्या आजवरच्या इतिहासात झालेल्या उच्चांकी गर्दीच्या हल्‍लाबोल सभेपर्यंतची त्यांची पक्षांतर्गत वाटचाल तितकीच अर्थपूर्ण ठरली आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने त्यांच्याकडे आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद राजकीय वर्तुळात त्यांच्या विरोधकांनादेखील आव्हानात्मक ठरणारे आहे. अलिकडे त्यांचे चिरंजीव राजवर्धन व प्रतीक हेदेखील या परिसरात सामाजिक उपक्रमांत दिसत आहेत, ही त्यांच्यासाठी आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे.

Tags : Sangli, Jayant Patil, challenge, State president, post Responsibility,