Wed, Apr 24, 2019 20:15होमपेज › Sangli › कर्नाटकमधील भाजपच्या यशाच्या सांगलीत जल्लोष

कर्नाटकमधील भाजपच्या यशाच्या सांगलीत जल्लोष

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:11PMसांगली : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाचा आनंद येथे  कार्यकर्त्यांनी जल्लोषात  साजरा केला. शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, पेढेवाटप करीत ढोल-ताशे वाजविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा करिष्मा वाढतच असल्याचा दावा नेत्यांनी व्यक्‍त केला.

आमदार गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणुकीतील सुक्ष्म नियोजनाचा हा परिपाक आहे. मोदी लाट ओसरल्याबद्दल  खालच्या थराला जाऊन अनेकांनी प्रचारात टीका केली होती. परंतु जनतेने आजही मोदींच्या विकासाभिमुख देशकार्यालाच या निवडणुकीतून साथ दिली आहे. कर्नाटकातील परिवर्तन ही आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचीच नांदी आहे. या यशामुळे मिशन महापालिकेसाठी मोठे बळ मिळणार आहे. यावेळी शेखर इनामदार, मुन्ना कुरणे,  शरद नलावडे, लक्ष्मण नवलाई, प्रकाश सूर्यवंशी, श्रीकांत शिंदे, सुब्राव मद्रासी, चंद्रकांत मालवणकर, गणपती साळुंखे, गणेश कातगडे उपस्थित होते.

विकासाला एकमेव भाजपच पर्याय : संजय पाटील

खासदार संजय पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या व्हीजनलाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत याच आधारे 21-22 राज्यांत परिवर्तन घडून भाजपची सत्ता आली आहे. कर्नाटकातही सत्ताधारी काँग्रेसने मोठे आव्हान उभे केले होते. परंतु मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विकासाच्या आश्‍वासनाला जनतेने साथ दिली. विकासाला एकमेव भाजपच पर्याय असून, हे परिवर्तन साहजिकच शत-प्रतिशत भाजपची वाटचाल आहे. आगामी महापालिका निवडणुकीतही याच पध्दतीने आम्ही एकदिलाने व ताकदीने परिवर्तन घडवू.