Wed, May 22, 2019 16:52होमपेज › Sangli › ‘कास्टिंग काऊच’वरून गदारोळ

‘कास्टिंग काऊच’वरून गदारोळ

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:23PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्था 

‘कास्टिंग काऊच’वरून देशात गदारोळ उडालेला आहे. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी संबंधित महिलेचा गैरफायदा घेणे, याला ‘कास्टिंग काऊच’ म्हटले जाते. बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी याविषयी वक्‍तव्य केले आणि खासदार रेणुका चौधरी यांनी त्यापुढे मजल मारल्याने खळबळ उडाली.

‘कास्टिंग काऊच’मुळेच बॉलीवूडमध्ये रोजगार : सरोज खान

सांगली : प्रतिनिधी

बलात्कार किंवा ‘कास्टिंग काऊच’नंतर सिनेसृष्टीत तसेच सोडून दिले जात नाही, तर कामही दिले जाते, असे खळबळजनक वक्‍तव्य प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी केले. 69 वर्षीय सरोज खान यांच्या वक्‍तव्याचे पडसाद दिल्‍लीपर्यंत उमटले. 

हे प्रकार बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत.  सरकार आणि सरकारचे लोकही मुलींचे शोषण करतात, मग बॉलीवूडवरच टीका का केली जाते,  असा सवालही त्यांनी केला. बॉलीवूड कमीत कमी पीडितेला रोजी-रोटी तरी देते. बलात्कार करून सोडून देत नाही. तुमच्याकडे कला असेल, तर तुम्हाला बॉलीवूडशी तडजोड करण्याची गरज नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  तेलगू अभिनेत्री सरी रेड्डीने ‘कास्टिंग काऊच’विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेबाबत पत्रकारांनी सरोज खान यांना प्रश्‍न विचारला होता. 

सरोज खान यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूडमधून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सरोज खान यांनी माफी मागितली. सरोज खान यांनी ‘एक दोन तीन’, चोली के पिछे’ अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे.

संसदेतही ‘कास्टिंग काऊच’: खा : रेणुका चौधरी  

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा 

केवळ सिनेसृष्टीतच नव्हे, तर संसदेतही ‘कास्टिंग काऊच’सारखे प्रकार होतात, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी केला आहे. बलात्कार आणि ‘कास्टिंग काऊच’नंतरच सिनेसृष्टीत रोजगार मिळतो, असे वक्‍तव्य नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी केल्यानंतर रेणुका चौधरी यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना  संसदेचा उल्‍लेख केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
‘मी-टू’ म्हणत आवाज उठविण्याची हीच वेळ आहे. आपण भारतीय आता बिनधास्तपणे पुढे येत असून, आपल्याबाबत काय घडले हे सांगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘कास्टिंग काऊच’ म्हणजे काय? 

चित्रपटात भूमिका देण्यासाठी निर्माता, दिग्दर्शक किंवा इतरांकडून एखाद्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणे किंवा तिच्यावर जबरदस्ती करणे याला ‘कास्टिंग काऊच’ असे म्हणतात. ‘कास्टिंग’ म्हणजे भूमिका, तर ‘काऊच’ याचा अर्थ ‘कोच’ असा होतो. म्हणजे भूमिका देणारा एखाद्या मुलीशी, महिलेशी कोचवर शरीरसंबंध ठेवतो म्हणून याला ‘कास्टिंग काऊच’ असे म्हटले जाते.

Tags : sangli, casting cowch issue, sangli news,