Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Sangli › सराफासह चौघे हद्दपार

सराफासह चौघे हद्दपार

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 13 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

जबरी चोरीसह लूटमारीसारखे गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी एका सराफासह चौघांना चार जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये तासगाव येथील टोळीचा म्होरक्या रौनक खेराडकर याचा समावेश आहे. लूटमारी, चोरीसारख्या गुन्ह्यात सराफाला हद्दपार केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. 

रौनक उर्फ विश्वजीत मुकुंद खेराडकर (20, खेराडकर वाडा, तासगाव), अनिल शिवाजी बाबर (31, खोतनगर, मिरज), अभि उर्फ रोहित तानाजी चव्हाण (21, सरस्वती गल्ली, तासगाव) आणि कपील उर्फ प्रफुल्ल शशिकांत होवाळे (19, दत्त मळा गल्ली, तासगाव) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या चौघांनाही  सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून वर्षासाठी तडीपार करण्यात आले. 

सोनसाखळी चोरांचा म्होरक्या रौनक याचा तासगावमध्ये सराफी व्यवसाय आहे. टोळीने 2017 पासून संजयनगर परिसरात जबरी चोरी, लूटमारीसारखे गंभीर गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यानच्या काळात चौघेही कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. चोरीचे सोने घेणे, चेन स्नॅचिंग करणे यात रौनकचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता. या टोळीने संजयनगर परिसरात दहशत निर्माण केली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिद्धापापा रूपनगर, विशाल भिसे यांचा कारवाईत सहभाग होता.